आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामविकासासाठी सरपंचांनी घ्यावा पुढाकार : धनंजय मुंडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सरपंचांनी पुढाकार घेतल्यास नक्कीच अादर्श गाव निर्माण करता येईल, असे प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे यांनी केले. श्री स्वामी समर्थ कृषी विकास संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर आयोजित ‘सरपंच मांदियाळी’ परिषदेत ते बोलत होते. मुंडे म्हणाले की, जिल्हा परिषद सदस्य आणि उपाध्यक्षपदी काम केल्यानेच ग्रामपंचायतींना विकासासाठी येणाऱ्या अडचणींची चांगली माहिती आहे. सध्या केंद्र सरकार स्मार्ट सिटी योजना राबवित आहे. त्याच धर्तीवर ग्रामीण भागालाही पुढे आणण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतींना विकासकामे करताना आजवर जिल्हा परिषद, पंचायत समितींवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, गेल्या काही वर्षात सरकारने पंचायतराज कायद्यात सुधारणा करून ग्रामपंचायतींना स्वायत्तता मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आता १४व्या वित्त आयोगामार्फत सरकार राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याबरोबरच तो खर्च करण्याचे अधिकार देत आहे. याचा पुरेपूर लाभ ग्रामपंचायतींनी उठवावा, असे अावाहनही त्यांनी केले.

या वेळी अण्णासाहेब मोरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना समृद्ध गावाला अध्यात्माची जोड देण्याचे अावाहन केले. यावेळी माउलींच्या हस्ते सरपंच पुरस्कार देण्यात आले. परिषदेचे अध्यक्ष नवनाथ काकडे आदींनी मनोगत व्यक्त केले. राज्यभरातून मोठ्या संख्येने सरपंच उपस्थित होते. शनिवार असल्याने शहरवासीयांनी प्रदर्शन पाहण्यासाठी गर्दी केली होती. या वेळी आमदार जयवंत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, एकनाथ ढाकणे, नाना महाले उपस्थित होते.

दरम्यान, श्री स्वामी समर्थ संस्थानमार्फत होणाऱ्या कृषी महोत्सवामुळे शेतकऱ्यांना नवसंजीवनी मिळत आहे. त्यामुळे दरवर्षी होणाऱ्या महोत्सवाला हजेरी लावू, असा मानस यावेळी मुंडे यांनी व्यक्त केला.

यंदाचे आदर्श सरपंच भास्करपुरे : पाटोदा (औरंगाबाद), शंकरराव खेमनार : साकूर (अहमदनगर), तुकाराम सांगळे : माळेगाव (नाशिक).