आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सटाणा तालुक्यात शह-काटशहचे राजकारण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सटाणा: माजी आमदार दिलीस बोरसे, विद्यमान आमदार उमाजी बोरसे यांचा प्रभाव असलेला मोसम पट्टा हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. हा किल्ला सर करण्याच्या दृष्टीने जामखेडा, ताहाराबाद, नामपूर गटांमध्ये शह-काटशहाचे राजकारण सुरू असून, राष्ट्रवादीने व्यूहरचना आखली आहे.
गेल्या निवडणुकीत ताहाराबाद गटातून भाजपच्या सीमा भामरे या विजयी झाल्या होत्या. आगामी निवडणुकीत हा गट इतर मागास वर्ग प्रवर्गासाठी आरक्षित आहे. भामरे यांनी गटात उल्लेखनीय विकासकामे केल्यामुळे किशोर भामरे भाजपकडून दावेदार मानले जातात. विलास निकम, सुरेश महाजन, सुभाष पवार, जिभाऊ भामरे हे देखील इच्छुक असून, त्यांनीही मुलाखती दिल्या आहेत. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवार चित्रा वंदन यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती. नंदन हे उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत.
तालुक्यात कॉँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचा प्रभाव अधिक असल्यामुळे इच्छुकांची संख्या अधिक आहे. त्यात डॉ. प्रशांत सोनवणे, समता परिषदेचे अशोक खैरनार, ताहाराबादचे सरपंच संदीप साळवे आदींचा समावेश आहे. त्यात बाजी नंदन की, सोनवणे मारतात याचीच चर्चा असली तरी वीरगाव गटात धर्मा खैरनार यांना उमेदवारी दिली गेली, तर नंदन यांचे तिकीट कापले जाईल. न मिळाल्यास नंदन हे गटासाठी उमेदवार असतील अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. कॉँग्रेसची सचिन कोठावदे यांनी बांधणी केली आहे. तसेच डॉ. नितीन पवार, गिरीश भामरे हे इच्छुक उमेदवार आहेत.
या गटात मनसेने ही चाचपणी केली असून ,मधुकर महाजन, रोहिदास मानकर, उमेश निकम, सुभाष पवार आदी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असले तरी ग्रामीण भागात मनसेचा अद्याप प्रभाव नसल्याने ज्या कोणास उमेदवारी मिळाली तरी त्याचा निवडणुकीवर फारसा परिणाम होण्याची चिन्हे नाहीत. या गटामध्ये तिरंगी लढतीचे संकेत असून, इच्छुक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.
गत पंचवार्षिक निवडणुकीत ताहाराबाद गणातून भाजपचे नारायण माळी तर अंतापूर गणातून कॉँग्रेसचे स्व. शामकांत पवार निवडून आले होते. पवार यांचे निधनानंतरच्या पोट निवडणुकीत भाजपचे यशवंत अहिरे यांनी विजय मिळविला होता. आगामी निवडणुकीत ताहाराबाद गण सर्वसाधारण महिला आरक्षित असून, अंतापूर गण ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. ताहाराबाद गणातून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या वतीने प्रमिला सुभाष नंदन, उषा शिवाजी भामरे, वंदना कडू भामरे, कॉँग्रेस पक्षाच्या वतीने शीतल योगेश नंदन, हर्षदा नंदन, शोभा कांकरिया, प्रीती कोठावदे, तृप्ती भामरे, जयर्शी पवार, शीतल पवार तर भाजपच्या वतीने हिराबाई साळवे, सुनंदा भामरे इच्छुक उमेदवार आहेत.
अंतापूर गण प्रवर्ग महिला राखीव असून, भाजपच्या वतीने त्यांना वसंत गवळी, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या वतीने रखमाबाई सोनवणे तर कॉँग्रेस पक्षाच्या वतीने सोनाली पवार इच्छुक उमेदवार आहेत. राष्ट्रवादी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, माजी आमदार संजय चव्हाण यंनी या गटावर लक्ष केंद्रित केले असले, तरी आजी व माजी आमदार बोरसे बंधुंचाच या गटावर वरचष्मा आहे. हा गट भाजपच्या हातून जाणार नाही. यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करीत आहेत. तर कॉँग्रेस पक्ष आपली काही किमया या गटात, तर करणार नाही ना? याबाबतही निवडणूक फड रंगत आहे. एकूणच या गटात तिन्ही पक्षांचे मातब्बर उमेदवारांना संधी देऊन तिरंगी लढतीची शक्यता आहे.