आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर गुन्ह्यांच्या तपासात ‘सतर्क’ ठरणार मार्गदर्शक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंभीर गुन्ह्यांची माहिती तत्काळ उपलब्ध होण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासी अधिकाऱ्यावर अवलंबून राहावे लागते. मात्र, आता अशा गुन्ह्यांची माहिती १३ पोलिस ठाणी आणि गुन्हे शाखेच्या तीन पथकांच्या अधिकाऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होत आहे. पोलिस आयुक्तांच्या संकल्पनेतून ‘सतर्क’ हे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून, ठाण्यानंतर शहर पोलिस आयुक्तालयात ही संकल्पना राबविण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरमुळे मुख्यालयाच्या हद्दीत घडलेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत आहे.
पोलिस दलात क्राइम मॉनिटरिंग सिस्टिम प्रणाली कार्यान्वित आहे. पोलिस अायुक्तालयाच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची इत्थंभूत माहिती या सॉफ्टवेअरच्या अाधारे मिळत आहे. गुन्ह्याचा पंचनामा,घटना तारीख, वेळ आणि घटनेचा तपशील अादी बाबींसह गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाल्याचा कालावधी, तपासी अधिकाऱ्यांची सर्व महिती या सॉफ्टवेअरद्वारे दिली जाते. पोलिस आयुक्त, उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि वरिष्ठ निरीक्षकांसह संबंधित गुन्ह्याचा तपास करणाऱ्या अधिकारी ऑनलाइन सर्व माहिती एकमेकांशी शेअर करू शकतात. चॅटिंगद्वारे गुन्ह्यांसंबंधी वरिष्ठांकडून मार्गदर्शनही मिळत असल्याने या सॉफ्टवेअरमुळे १३ पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेचे युनिट एकमेकांशी जोडले गेले आहेत. सॉफ्टवेअरची सर्व माहिती सायबर क्राइमच्या कार्यालयात जतन करण्यात आली आहे. पोलिस उपआयुक्त (गुन्हे) आणि परिमंडळ मधील गुन्हेगारांसह, गंभीर गुन्ह्यांची माहिती, वाॅन्टेड गुन्हेगारांची माहिती, तडिपार-सराईत गुन्हेगारांच्या फोटोसह सर्व माहिती पोलिस आयुक्तांसह, उपआयुक्त, सहायक आयुक्त आणि सर्व पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ अधिकारी एक क्लिकवर उपलब्ध करू शकतात. ठाण्यानंतर नाशिकमध्ये सतर्क सॉफ्टवेअर यशस्वी झाले आहे. या प्रणालीमुळे पोलिस अधिकाऱ्यांमध्ये समन्वयासह गुन्ह्यांसंबंधी माहितीचे आदान-प्रदान शक्य होणार आहे.

गुन्ह्यांसंबंधी माहिती एका क्लिकवर
^वरिष्ठ अधिकाऱ्यांसह तपासी अधिकाऱ्यांना गुन्ह्यांची माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. या अाधारे गुन्ह्यांचा तपास करणे सोपे जाणार असून, सर्व बाजूंनी तपासाची दिशा ठरविली जाणार आहे. गुन्ह्यांचा तपास दोषारोपपत्र वेळेत दाखल होऊन शिक्षेचे प्रमाण वाढण्यास मदतकारक ठरणार असल्याने हे सॉफ्टवेअर यंत्रणेसाठी उपयुक्त ठरणार आहे. - सचिन गोरे, सहायकआयुक्त (गुन्हे)
बातम्या आणखी आहेत...