आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ताज्या भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध सातपूरचा बाजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर- सातपूरला औद्योगिक नगरी स्थापन झाल्यानंतर कामगारांना दर बुधवारी आठवड्यातील सुटी मिळायची.त्यामुळे बुधवारी आपल्या कुटुंबियांसह सातपूरच्या भाजी बाजारात खरेदी करण्यासाठी कामगारांची गर्दी असते. गेल्या सात ते आठ वर्षांपासून कामगारांना शनीवारी साप्ताहीक सुटी मिळत असताना बुधवारच्या आठवडे बाजाराची क्रेझ कायम आहे.

औद्योगिकनगरीमुळे सातपूरला राज्यासह परराज्यातील कामगार व त्यांचे कुटुंबिय स्थायीक झालेले आहे. या कामगारांना यापुर्वी बुधवारी साप्ताहीक सुटी मिळत असे. त्यामुळे खरेदीचा बेत बुधवारीच ठरायचा. परीसरातील शेतकर्‍यांसह कीरकोळ विक्रेतेदेखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ताजा भाजीपाला ठेवण्यावरच भर देत असे. थेट शेतकरीच माल विक्री करीत असल्याने भाजीपाल्याचे दरही कमीच असायचे. पुर्वी रस्त्यावरच दुकाने थाटणार्‍या व्यावसायीकांना महापालिका झाल्यानंतर भाजी मंडई बांधुन देण्यात आली. या मंडईत आजमितीस दीडशे ते दोनशे भाजी विक्रेते व्यवसाय करीत आहेत. मंडई झाल्यामुळे विक्रेत्यांमध्येच स्पर्धा वाढल्याने ग्राहकांनाही परवाडणार्‍या दरात भाजीपाला मिळत आहे.सातपूरच्या या छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईत सातपूरसह त्रंबकेश्वर तालुक्यातील तळेगांव, अंजनेरी, वाढोली, महिरावणी, बेलगांव ढगा, विद्यामंदीर अशा विविध ठिकाणचे शेतकरी भाजीपाला पुरवितात. रोजच्या रोज ताजा भाजीपाला सातपूरच्या मंडईत मिळत असल्याने उच्चभ्रु वसाहत समजल्या जाणार्‍या महात्मानगर या परीसरातील रहिवाश्यांसह चुंचाळे, विराटनगर, पिंपळगाव बहुला, सातपूर कॉलनी, अशोकनगर, र्शमिकनगर, शिवाजीनगर या परीसरातील नागरीक भाजीपाला खरेदी करण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे कारखाने सुटल्यानंतर सिडको परीसरात राहणारे कामगारही सातपूरच्याच भाजीपाल्याला पसंती देतात.

असे आहेत दर
मेथी जुडी- 20 रुपये, पालक जुडी- 10 रुपये, शेपु जुडी- 15 रुपये, कोथंबीर जुडी- 25 ते 30 रुपये, कांदा पात- 15 रुपये, हिरवी मिरची - 70 ते 80 रुपये कीलो, सिमला मिरची- 40 रुपये किलो, आद्रक- 150 रुपये किलो, बटाटा- 16 रुपये किलो, कांदा- 12 रुपये किलो, फ्लॉवर- 40 रुपये किलो, गवार- 35 रुपये किलो, भेंडी- 30 रुपये किलो, शेवगा- 20 रुपये किलो,वांगी- 40 रुपये किलो, टॉमेटो- 20 रुपये किलो

जळगावची कुरडई
जळगाव तालुक्यातील एरंडोल येथील एक विक्रेता या बाजारात रेडिमेड कुरडई विक्रीसाठी आणतो. 60 रुपयांमध्ये अर्धा किलो कुरडया येथे मिळतात. एका किलोमध्ये 80 ते 90 नग बसतात. लग्नसराईमुळे या कुरडईस ग्राहकांनी पसंती दिली आहे.

परवडणारे दर
उन्हाळ्यामुळे भाजीपाला कमी येत असल्याने सध्या मेथीसह अन्य पालेभाज्यांचे दर जास्त आहेत. तरीही इतर ठिकाणांच्या तुलनेत सातपूरच्या भाजीबाजारातील दर ग्राहकांना परवडतात.
-नागेश घोडके, भाजी विक्रेता

दोन दिवस गर्दी
आजमितीस जरी कामगारांना शनीवारी सुटी असली तरी बांधकाम करणार्‍या मजुरांना बुधवारीच सुटी मिळते. त्यामुळे सातपूरच्या भाजीबाजारात बुधवार व शनीवार या दोन्ही दिवशी इतर दिवसांपेक्षा व्यावसायीकांचा दुप्पट धंदा होतो.
-दत्तात्रेय मोराडे, भाजी विक्रेता