आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग सभापतींना ना रस्ता, ना पाणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर - स्वातंत्र्याच्या 65 वर्षांनंतर व महापालिका स्थापनेच्या 30 वर्षांनंतरही सातपूर प्रभागाचे सभापती सचिन भोर यांच्या कुटुंबीयांना पुरेशा नागरी सुविधा नाहीत. निधीअभावी भोर कुटुंबीयांना पिण्याचे पाणी व रस्ता या मूलभूत सुविधांसाठी अजूनही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
सातपूर विभागातील चुंचाळे शिवारात 1940 पासून भोर कुटुंबीय राहतात. चुंचाळे गावापासून 500 फुटांच्या अंतरावरील भोर यांच्या घरात 30 जणांचे कुटुंब राहते. महापालिका हद्दीत असूनही हे गाव नागरी सुविधांपासून वंचित आहे. सभापतींच्या घराकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने त्यांना पायवाटेने पायपीट करावी लागते. मनपाने पाण्याची पाइपलाइन टाकली नसल्याने कुटुंबीयांना बोअरवेलचे पाणी फिल्टर करून प्यावे लागते. पिण्याच्या पाण्यासाठी मनपाकडे अर्ज केल्यानंतर त्यांना अर्धा इंची पाइपलाइन प्रशासनाने टाकून दिली होती. मात्र, मुळातच कमी व्यासाच्या पाइपलाइनला हे कनेक्शन जोडले असल्याने त्यांच्या घरापर्यंत पाणी जातच नाही.
भोर कुटुंबीयांनी स्वखर्चाने मुरूम टाकून रस्ता तयार केला असला तरी पावसाळ्यात या रस्त्यावर भरपूर चिखल होतो. नागरी सुविधा मिळत नसल्यानेच सचिन भोर यांनी राजकारणात प्रवेश करून 2012 मध्ये पालिकेची निवडणूक लढविली. स्थानिक विकासाचा मुद्दा उचलून धरल्याने नागरिकांनीही त्यांना भरघोस मतांनी निवडून दिले.
त्यानंतर सातपूर प्रभागाच्या सभापतिपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. त्यामुळे चुंचाळेवासीयांच्या अपेक्षा उंचावल्या. मात्र, महापालिकेच्या तिजोरीत खडखडाट झाल्याने अजूनही काही काळ त्यांना सुविधांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.