आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Satu Lo Bodo News In Marathi, Japanese, Divya Marathi

...अन् तो सुखरूप परतला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा दिवसांपासून इगतपुरीच्या विपश्यना केंद्रात दाखल झालेले जपानी पर्यटक सतू लो बोडो हे दररोज केंद्राच्या सभागृहाबाहेरील खिडकीतून बाहेरचे निसर्गसौंदर्य न्याहळत. त्यावेळी तेथील मोहक डोंगररांगा त्यांना खुणावत असत. मात्र, शिबिराचा कालावधी पूर्ण झाल्याशिवाय बाहेर पडण्याची परवानगी नसल्याने त्यांना तेथे जाता येत नव्हते. अखेरीस रविवारी शिबिराची सांगता होताच ते बाहेर पडून ते आपल्या सहका-यांसह त्या कड्याजवळ गेले. तेथे पोहोचल्याच्या आनंदात त्यांनी मोबाइलवरून परिसराची छायाचित्रे घ्यायला सुरूवात केली. अशातच अचानक त्यांचा पाय घसरला आणि तोल जावून ते धम्मगिरीच्या मागे असलेल्या या कड्यावरून खाली कोसळले. तथापि, सुदैवाने थोड्याच अंतरावरील कपारीत ते अडकून बसले. धक्यातून सावरताच त्यांनी बचावासाठी आता काय करता येईल, त्याचा विचार केला आणि जवळचा मोबाइलच त्यांच्या मदतीला धावून आला. जखमी अवस्थेतच त्यांनी कसाबसा मोबाइल काढला आणि प्रसंगावधान राखत विपश्यना केंद्राशी संपर्क साधला. आपण कुठे अडकलो आहोत, त्याची माहिती संबंधितांना देताच पुढील बचावकार्य वेगाने सुरू झाले. केंद्रातील कर्मचा-यांनी तातडीने इगतपुरीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस. आर. कोळेकर यांच्याशी संर्पक साधला. प्रसंग बाका असल्याची जाणीव कोळेकर यांना झाली व त्यांनी तेथे उपस्थितीत असलेल्या तसेच गस्तीवर गेलेल्या जवळपास 15 कर्मचा-यांना बोलावून घेतले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेअंती या प्रसंगातून त्याला जवळच्या वस्तीतील आदीवासी ठाकर बांधवच सहीसलामत बाहेर काढू शकतील, हे समजले व त्यांनी तातडीने त्यांना आणण्यासाठी वाहनाचा बंदोबस्त केला. इगतपुरीच्या अग्नीशमनदलालाही सोबत घेण्यात आले. हे पथक घटनास्थळी पोहचल्यानंतर सर्वांचे सामूहिक प्रयत्न सुरू झाले. तब्बल तासभराहून अधीक काळाच्या अथक प्रयत्नांनतर ‘सत लो बोडो’ याला सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. त्यानंतर त्यास तत्काळ ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.


दुभाषांची मदत
कपारीत अडकलेला पर्यटक व त्याच्यासोबतचे सहकारी जपानी असल्याने मदतकार्या प्रसंगी तसेच, संवाद साधतेवेळी भाषेची अडचण जाणवत होती. त्यामुळे जपानी भाषा जाणणा-यांचा शोध सुरू झाला. योगायोगाने याच शिबिरात आलेले नेपाळचे स्वयंप्रकाश दर्शन व नितीन वेंगसरकर यांना जपानी भाषा अवगत असल्यामुळे संवाद सुकर झाला. त्यानंतर ही सगळी हकीकत उभयतांनी पोलिसांना कथन केली.


प्रचंड तणावानंतर आनंदाश्रू
पर्यटक आणि तोही विदेशी असल्याने त्याचे प्राण वाचविणे हे देशाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे कर्तव्य बनले होते. हा प्रकार समजल्यापासून संपूर्ण यंत्रणाच तणावात आली होती. तास-दीड तासाच्या प्रचंड तणावानंतर त्यास सुखरूप बाहेर काढताच सर्वांना हायसे वाटले. त्यावर प्राथमिक उपचारानंतर तो पोलिस कर्मचा-यांसोबत पोलिस ठाण्यात आला. जपानी पद्धतीने प्रत्येक कर्मचा-याला भेटून कंबरेत वाकून तो कृतज्ञता व्यक्त करीत होता. हा प्रकार बघून माझ्यासह सर्वांच्याच डोळ्यातून आनंदाश्रूच वाहू लागले.
- एस.आर. कोळेकर, वरिष्ठ निरीक्षक, इगतपुरी