नाशिक- सार्वजनिक वाचनालयाने आपल्या दुर्मिळ वस्तूंचा ठेवा असलेले वस्तुसंग्रहालय विनामूल्य खुले करत विद्यार्थ्यांना उन्हाळी सुटीची अनोखी भेट दिली आहे. शुक्रवारी हा ठेवा खुला करण्यात आला. तब्बल दीड महिना अर्थात 15 जूनपर्यंत विद्यार्थ्यांसाठी दररोज दुपारी हे वस्तुसंग्रहालय पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रविवारचा सुटीचा दिवस वगळता दररोज दुपारी 4 ते 7.30 वाजेदरम्यान हे वस्तुसंग्रहालय विद्यार्थ्यांसाठी खुले राहणार आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या आणि दुर्मिळ वस्तूंचे दर्शन सहजतेने घेता यावे, यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.‘सावाना’च्या इमारतीमधील खालच्या मजल्यावर हे वस्तुसंग्रहालय आहे.
या पुरातन वस्तूंचे दर्शन
या वस्तुसंग्रहालयात पुराणकालीन तलवारी, चिलखते, भाला, तोफगोळा, तसेच निरनिराळ्या पुरातन वस्तू, मूर्ती, मराठा कालखंडातील नाणीसंग्रह, सातकर्णी, शिवछत्रपती यांची दुर्मिळ नाणी, शिलालेख, ताम्रपट, काचचित्रे, पाषाण आणि काष्ठशिल्पे, दुर्मिळ तिकिटे, धातूंच्या देवदेवता, गंजिफा, नक्षीदार पानपुडे, वज्री, अडकित्ते, लामण दिवे, पाण्यावर तरंगणारी वीट, धार्मिक ग्रंथ, मोडी कागदपत्रे, रागमाला, सुमारे 150 वर्षांपूर्वीचा नाशिकचा नकाशा, ईस्ट इंडिया कंपनीने तयार केलेला 1859 सालातील भारताचा नकाशा आदी दुर्मिळ वस्तूदेखील पाहण्याची
संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
विद्यार्थ्यांनी घ्यावा लाभ
अत्यंत दुर्मिळ अशा या वस्तूंना विनामूल्य पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यवाह मिलिंद जहागीरदार आणि सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने केले आहे.