आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरकरनगरची अतिक्रमणे ऐरणीवर, मिठाईची दुकाने अन्य व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे रस्ता बनला ‘वाहनतळ’

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूररोड वरील सावरकर नगरला देखील अतिक्रमणांचा विळखा पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. हा प्रश्न ऐरणीवर असून, परिसरातील मिठाईच्या दुकानांसह अन्य व्यावसायिकांच्या अतिक्रमणांमुळे रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. या परिसरातील अतिक्रमणे तातडीने हटविल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सावरकरनगर नागरिक मंचाने दिला आहे.

सावरकरनगरमधील मिठाईच्या दोन दुकानांसमोर रोजच सकाळच्या वेळेत, तसेच सायंकाळी ते ८.३० दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊन छोटे-मोठे अपघात घडतात. ध्वनी अन‌् वायू प्रदूषणातही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अनेक व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करून पक्क्या भिंती पक्के ओटे बांधलेले आहेत. एका मिठाईच्या दुकानाच्या अतिक्रमित कंपाउंडला लागून असलेल्या विजेच्या खांबामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते.

शंकरनगरकडे जाणाऱ्या रस्त्याजवळ दुधाची डेअरी थाटण्यात आली आहे. येथील विक्रेता सकाळी ५.३० वाजता त्याचे दुकान उघडतो. हा विक्रेता दुकानाच्या बाहेर दूध विक्रीस बसत असून, त्यामुळे दूध खरेदी करणारे ग्राहक रस्त्यावर त्यांची वाहने पार्क करतात. परिणामी, वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. सायंकाळच्या वेळेस अगदी शंकरनगरपर्यंत वाहनांच्या लांबलचक रांगा लागलेल्या दिसून येतात. समोरच नवरचना शाळा असल्यामुळे शाळा सुटल्यानंतर वदि्यार्थ्यांनादेखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. या दूधविक्रेत्याने त्याच्या दुकानासमोर अतिक्रमित शेड उभारले आहे, तसेच तो सोसायटीच्या संरक्षक भिंतीला टेकून त्याची दूध विक्री करीत असल्यामुळे नगरातील नागरिकांच्या समस्येत भर पडली आहे. या डेअरीलगतच एका दुकानदाराने बाहेरून फॅब्रिकेटेड जिना उभारून अतिक्रमण केले आहे. अर्चित रेजन्सी सहकारी संस्थेतील इमारतीत हार्डवेअरचे दुकान असून, संबंधित व्यावसायिक दुकानातील साहित्य दुकानाबाहेर ठेवतो. प्रत्येक दुकानदाराने आपापल्या गाळ्यासमोर पक्के बांधकाम करून भिंती बांधल्या आहेत, तसेच पक्के ओटेदेखील बांधलेले आहेत. हे पक्के बांधकाम तोडल्यास पार्किंगची जागा मोकळी होईल.
परिसरातील अनेक दुकानांसमोर पार्किंगसाठी जागा नसल्याने अशाप्रकारे ग्राहक आपली वाहने रस्त्याच्या कडेलाच उभी करतात. शंकरनगर परिसरातदेखील बेशिस्त पार्किंगची समस्या कायम असून, या परिसरात असलेली शाळा सुटल्यानंतर वदि्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची रस्त्याच्या कडेलाच रांग लागत असल्याने वाहतूक कोंडीत अधिक भर पडते.

गंगापूररोडवरील सावकरकरनगर परिसरात असलेल्या काही मिठाईच्या दुकानांसमोरच चारचाकी, दुचाकी वाहने अशी बेशिस्तपणे उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीचा नेहमीच खोळंबा होतो. अनेकदा छोटे-मोठे अपघातदेखील होत असतात.

सावरकरनगरमधील नागरिकांच्या प्रमुख मागण्या :
- मिठाईच्यादुकानांसमोरील अतिक्रमित कंपाउंड वाॅल खांब काढावा.
- सलूनलगत असलेला अतिक्रमित ओटा काढावा त्या जागेवर रस्ता तयार करावा.
- लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीलगत नो पार्किंग झोन घोषित करावा, परिणामी रस्त्याला लागून वाहने उभी राहणार नाहीत.
- दूध डेअरीचे अतिक्रमित शेड काढावे.
- डेअरी व्यावसायिकास दुकानाबाहेर बसून दूध विक्री करण्यास मज्जाव करावा.
- हार्डवेअरच्या दुकानाबाहेर ठेवण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात यावे.
- गाळ्यांसमोरील रस्त्यावर वाहने पार्क होऊ नयेत म्हणून दुकानदारांना नोटिसा द्याव्यात.
- दुकानांसमोरील अतिक्रमित आेटे काढण्यात यावेत.
जनहितयाचिका दाखल करण्याचा नागरिक मंचाचा इशारा
सावरकरनगर,शंकरनगर परिसरातील व्यावसायिकांनी केलेले पक्के अतिक्रमण कोंडीस कारणीभूत ठरत आहे. या मार्गाने होणाऱ्या बस वाहतुकीलाही अडथळे निर्माण होत असून, अपघात संख्येतही वाढ होत आहे. याप्रश्नी तीव्र आंदोलन छेडण्याचा, तसेच न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा सावरकरनगर नागरिक मंचाने दिला आहे.