आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सावरगावची जमीन अखेर सरकारजमा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - माजी प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी 4 मार्च 2013 रोजी मौजे सावरगाव येथील सव्र्हे नंबर 46 या 5 हेक्टर 4 आर शासकीय जागेला खासगी व्यक्तीचे नाव लावण्याचे दिलेले आदेश अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी रद्द केले.

हा नियमबाह्य निर्णय देणारे तत्कालीन प्रांत गोसावी, प्रशासन नायब तहसीलदार आणि सावरगावचे तलाठी यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता गोसावी यांचे बिंग उघड होण्यास सुरुवात झाली आहे.

नाशिकच्या प्रांताधिकारीपदाची धुरा सांभाळण्यापासूनच वादग्रस्त राहिलेल्या विनय गोसावी यांची कारभारातील अनियमिततेमुळे तडकाफडकी बदली करण्यात आली होती. त्यांनी शासकीय जमिनींवर खासगी व्यक्तीचे नाव लावणे, देवस्थानच्या जमिनी वाटप करणे, नियमबाह्य अकृषक परवाने देणे अशा विविध 58 प्रकरणांमध्ये अनियमितता दाखविली. त्यामुळे वर्षभरातच बदली झाल्यानंतर त्यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही शासनाने दिले. अशातच सावरगाव येथील गंगापूर धरणालगतच्या 5 हेक्टर 4 आर या शासकीय जमिनीवर वामन सुका कटारे व इतर चार यांचे नाव चढविण्याचा निर्णय प्रांतांनी दिला होता. या निर्णयाविरोधात अपर जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल झाली होती. त्यावर गुरुवारी अपर जिल्हाधिकार्‍यांनी निर्णय देत फेरफार नोंद 371, 372, 373, 374 रद्द केली, तसेच त्यावर महाराष्ट्र शासनाचे नाव कब्जेदार म्हणून लावण्याचेही आदेश दिले. यामुळे सावरगाव येथील सुमारे साडेबारा एकर जमीन सरकारजमा होणार आहे. तसेच याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत.

कारवाईबाबतचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे
तत्कालीन प्रांत आणि प्रशासन नायब तहसीलदार यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे उल्लंघन केल्याने कारवाई करण्याचा अहवाल विभागीय आयुक्तांना सादर करण्याचे आदेश प्रांत, तहसीलदारांना दिले, तर चुकीची पीकपाहणी करून उतार्‍यावर नोंद घेणार्‍या तत्कालीन तलाठय़ावर त्वरित कारवाईचे आदेश दिले आहेत.

सावरगावची जमीन साडेबारा कोटी रुपयांची
सावरगाव येथील या जमिनीचे क्षेत्र पाच हेक्टर चार आर म्हणजे साडेबारा एकर आहे. शासकीय मूल्यानुसार या जमिनीची किंमत 58 लाख 84 हजार 560 रुपये एवढी होते, तर आजच्या घडीला गंगापूर धरण आणि सावरगाव परिसरातील जमिनींचे भाव पाहाता एकरी एक ते सव्वा कोटी रुपये याप्रमाणे म्हणजेच सुमारे साडेबारा कोटी रुपये इतकी या जमिनीची किमत होते.