आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Save Children Life To Educat Them In Marathi Medium Bhalchandra Nemade

मुलांना मराठी माध्यमात घालून त्यांचे प्राण वाचवा - भालचंद्र नेमाडे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेणत्याही विषयाचे आणि सृष्टीचे मूळापासून आकलन मातृभाषेतच हाेत असते. आईकडून शिकताे ती मातृभाषाच मुलांची ज्ञानभाषा असायला हवी. इंटरनॅशनल स्कूल, काॅन्व्हेन्टमध्ये मुलांना घालणे बंद करा. मराठी माध्यमाच्या शाळेत घालून त्यांचे प्राण वाचवा, अशा भाषेत प्रख्यात साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी शिक्षणप्रणाली विरुद्ध टीकेची झाेड उठवली. त्याआधी ‘गिरणा गाैरव’ ‘जीवन गाैरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

येथील कालिदास सभागृहात गिरणा गाैरव साेहळ्यात अन्य १४ पुरस्कारार्थींना गिरणा गाैरव पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर ते बाेलत हाेते. इंग्रजी केवळ एक भाषा म्हणून इंग्रजी शिकू द्या, असेही नेमाडे यांनी नमूद केले. इंग्रजी माध्यमांतून शिकलेले केवळ टाय, बाे लावून झाडलाेटीचीच कामे करतात. मात्र मूलभूत ज्ञानाशी त्यांचा संबंधच येत नाही. त्यांच्यापेक्षा अडाणी, असंस्कृत आणि अशिक्षित म्हणवल्या जाणा-या माणसांनीच आपली संस्कृती टिकवली आहे. मात्र, अशिक्षित, अडाणी लाेकांचा हा भार आता आपण आपल्या डाेक्यावर घेतला पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले. जात्यावरच्या आेव्या, कविता, वासुदेवांची गाणी आणि अंगाईगीते हीच खरे साहित्य असल्याचेही नेमाडे यांनी सांगितले.

शेतकरीटॅक्स बसवावा : शेतीहा सगळ्यात चांगला व्यवसाय आहे, हे शेतक-यांनी लक्षात घ्यावे. शेतक-याच्या घरातील प्रत्येक व्यक्ती, गुरेढाेरे राबत असतात. अन्य उद्याेगांचे कामाचे तास निश्चित असतात. खरेतर शहरात राहणा-या नागरिकांना ते आयते खातात म्हणून टॅक्स बसवायला हवा. त्याला ‘शेतकरी टॅक्स’ म्हणा. असा टॅक्स लावून ताे पैसा शेतक-यांना मिळेल अशी चळवळच उभी करायला हवी, असेही त्यांनी सांगितले.

आनंद अॅग्रो ग्रुप आणि गिरणा गौरव प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कालिदास कलामंदिरात गिरणा गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समूहाचे अध्यक्ष उद्धव आहेर, प्रतिष्ठानचे सुरेश पवार, संचालिका वैशाली आहेर, मनपा आयुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांच्यासह मान्यवर या वेळी उपस्थित होते. स्वानंद बेदरकर यांनी सूत्रसंचालन केले.

नवीन काम करण्याची मिळाली प्रेरणा
सामाजिकक्षेत्रात काम करण्याची नवी प्रेरणा मला या पुरस्काराने दिली आहे. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीतून खूप काही शिकायला मिळाले. पुस्तके हीच मित्र झाल्याने नवीन शिकण्याची संधी मिळत गेली. सामाजिक विषयांवरील चित्रपटांतूनही मला खूप काही शिकायला मिळाले. स्मितातांबे, पुरस्कारार्थी

‘बांधावरचा उद्योजक’ पुस्तकाचे प्रकाशन
कमीकाळातच शेती शेतीपूरक क्षेत्रात गरूडभरारी घेतलेल्या नाािशकच्या आनंद अॅग्रो ग्रुपचे अध्यक्ष उद्धव आहेर यांच्यावर आधारित ‘बांधावरचा उद्योजक’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याचबराेबर गिरणागाैरव स्मरणिकेचेही या वेळी मान्यवरांच्या प्रकाशन करण्यात आले. लेखक दीपक चव्हाण यांचाही सत्कार करण्यात आला. यात प्रतिष्ठानचा मागील वृत्तांत देण्यात आला आहे.

शेतीपूरक व्यवसाय करावा
ग्रामीणभागात विकासकामांवर खर्च करण्याऐवजी मंदिर उभारण्यावर लाखो-कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. शेतक-यांची मुलांनी पैशांची उधळपट्टी करण्याऐवजी शेतीपूरक व्यवसायात उतरून उद्योग सुरू केले पाहिजे. शेतक-यांच्या मुलांची लग्ने होत नाही, असे वास्तव उलगडून सांगत शेती क्षेत्रातही उद्योग सुरू केला जाऊ शकतो, असे आनंद अॅग्रो समूहाचे अध्यक्ष उद्धव आहेर यांनी सांगितले.

यांचा झाला सन्मान
वेगवेगळ्याक्षेत्रात योगदान दिलेल्या १४ व्यक्तींचा गिरणा गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला. त्यात सुरेश खानापूरकर (सामाजिक), संजय पाटील (आर्किटेक्ट), विजय हाके (अधिकारी), विलास पाटील (बांधकाम), स्मिता तांबे (अभिनेत्री), दीप्ती राऊत (पत्रकार), सुभाष नंदन (सामाजिक), डॉ. द्विग्विजय शहा (वैद्यकीय), कृष्णा बच्छाव (शेती), अभिमन जाधव (शेती), सुनीता पाटील (सामाजिक), अविनाश भामरे (अधिकारी), प्रतिभा होळकर (सामाजिक), कवी कमलाकर देसले (शैक्षणिक) या मान्यवरांना या वेळी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.