आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काटकसरीची गरज : शाळांपासून गल्लोगल्ली मंत्र नवा... ‘पाणी वाचवा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जुलै महिना सुरू झाला, तरी पाऊस नसल्याने सामाजिक संस्था, राजकीय कार्यकर्त्यांसह महापालिकाही पाणी बचतीचा मंत्र जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरसावली आहे. ‘दिव्य मराठी’ने पाणीबचत अभियान सुरू केल्यानंतर व त्या-त्या परिसरात होणारा अपव्यय छायाचित्रासह

प्रसिद्ध केल्यानंतर सिडको आणि सातपूर प्रभाग सभापतींनी पाण्याचा अपव्यय करणा-यांवर कारवाईची घोषणा केली आहे. अनेक नगरसेवक या विषयावर जागृती करण्यासाठी पुढे आले आहेत. जुने नाशिकमध्ये होणा-या पाणीपुरवठ्यापैकी 80 टक्के पाण्याचा वापर योग्य होत असला तरी, अजूनही 20 टक्के पाणी वाया जाते. काही ठिकाणी नळांना तोट्या नसल्याने
पाणी रस्त्यावरून वाहते. पालिकेने, तोट्या देऊन भागणार नाही, तर प्रत्येकाने पाण्याचे महत्त्व जाणून घेणे गरजेचे असल्याने यापूर्वीही जनजागृती मोहीम राबवली होती. आता पुन्हा ही मोहीम हाती घेणार असून, शाळांपासून त्याला सुरुवात करणार असल्याचे प्रभाग सभापती समीना मेनन यांनी सांगितले.

सातपूरमध्ये गल्ली-गल्लीत जाणार
- पाणीबचत आजच्या क्षणाची नितांत गरजेची आहे. पाऊस वेळेवर पडला नाही; तर पाण्याची स्थिती बिकट होणार असून, ती टाळण्यासाठी ‘पाण्याचा अपव्यय करू नका, पाणी जपून वापरा’ अशा संदेशाचे आणि पाणी बचत कशी करू शकतो, या आशयाच्या टिप्स देणारी प्रसिद्धिपत्रके घेऊन वॉर्डात प्रत्येक घरापर्यंत जनजागृती करणार आहे. सलीम शेख, नगरसेवक

आतापासून पाणीबचत करणे नितांत गरजेचे
- केवळ आज वेळ आहे म्हणूनच नाही, तर नागरिकांनी कायमस्वरूपी पाणी काटकसरीने वापरायला हवे, असा संदेश आम्ही नेहमीच नाशिककरांना देत असतो. पावसाअभावी नजीकच्या भविष्यात दुष्काळसदृश उद्भवण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रत्येकाने आतापासूनच पाणीबचत करणे नितांत गरजेचे आहे. कविता कर्डक, गटनेत्या, राष्ट्रवादी काँग्रेस
फोटो - सिडकोत बेजबाबदार नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय होत असून, रस्त्यावरून पाणी वाहत आहे.