आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आज पाण्याचा खळखळाट.. उद्या ठणठणाट; बेफिकिरी दूर होणार तरी कधी?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जून महिन्याचे अखेरचे दोन दिवस शिल्लक असतानादेखील पावसाचा मागमूस दिसत नसल्याने पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात 40 टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे. राज्यभरात हीच स्थिती असून, पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत मुख्यमंत्र्यांपासून महापौरांपर्यंत सगळ्यांनीच नागरिकांना आवाहन केले आहे. या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’च्या चमूने शनिवारी (दि. 28) शहरातील काही भागात पाहणी केली असता अनेक ठिकाणी बेफिकीर नागरिकांकडून पिण्याच्या पाण्याचा सर्रास गैरवापर होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. हे चित्र बदलणे गरजेचे असून, त्यासाठी प्रत्येक नागरिकाने समजदारीची भूमिका घेणे गरजेचे झाले आहे.
धरणातील 40 टक्क्यांपैकी 15 ते 20 टक्के पाणी आवर्तनाच्या माध्यमातून इतर शहरांकरिता द्यावे लागणार आहे, म्हणजे नाशिककरांसाठी केवळ 20 टक्के पाणीच आरक्षित आहे. जून महिन्यात पाऊस पडला असता, तर पाण्याचा साठा वाढला असता. मात्र, आज तशी स्थिती नाही. देशभरात दुष्काळाबाबत मंथन सुरू झालेले असून, आपल्या प्रशासनालाही पाणीकपातीचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. याकरिताच ‘दिव्य मराठी’ने पाणी बचत अभियान सुरू केले असून, त्यात प्रत्येक शहरवासीयाने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
घरोघरी व्हावी काटकसर
आम्ही आमच्या मंडळाकडून विद्यार्थ्यांना प्रत्येकी दररोज पाच लिटर पाण्याची बचत करण्यासाठी सांगितले आहे. त्याची अंमलबजावणीदेखील केली जात आहे. पाणीबचत आजच्या स्थितीत अत्यंत गरजेची असून, प्रत्येक घरातून दररोज किमान दहा लिटर पाणी वाचविलेच पाहिजे, तरच अजून काही काळ आपल्याला पुरेसे पाणी मिळू शकेल.
सूर्यकांत रहाळकर, अध्यक्ष, भारतीय जलसंस्कृती मंडळ
प्रत्येकाचा हवा पुढाकार
४पाणी ही राष्ट्रीय संपत्ती असून, तिचा वापर जपून करायला हवा. लोकसंख्येच्या तुलनेत पाण्याचे स्त्रोत कमी पडत आहेत, ते वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत. आजची गंभीर परिस्थिती पाहता प्रत्येकाने पाणी वाचविले पाहिजे. जे लोक शॉवरने अंघोळ करीत असतील त्यांनी त्याऐवजी बादलीत पाणी घेऊन अंघोळ करायला हवी. त्या बरोबरच झाडांना पाणी घालण्यासाठी किंवा वाहन धुण्यासाठी बादली, मगाचा वापर करावा. रेन हार्वेस्टिंगसारखे उपक्रम महत्त्वाचे आहे.
कांता राठी, उपाध्यक्ष, माहेश्वरी महिला संघटन
काय दिसले ‘दिव्य मराठी’ चमूला
शहरातील पवनगर, उत्तमनगर, राणाप्रताप चौक सातपूर येथील काही भागात सकाळी ‘दिव्य मराठी’च्या चमूने पाहणी केली असता काही ठिकाणी नळाला तोट्याच नसल्याने बादल्या भरलेल्या होत्या आणि पाणी ओसंडून वाहत होते. काही ठिकाणी अंगणात सडा मारणे सुरू होते, तर हेच पाणी अगदी रस्त्याच्या कडे कडेने वाहत होते. काही नागरिक नळीने गाड्याही धुवत होते.
...असा वाचवू शकतो आपण थेंब अन् थेंब
- पाणी कधीच शिळे होत नाही, कालचे पाणी आज फेकून देऊ नका.
- वॉशिंग मशिनचा वापर काही दिवसांकरिता टाळा.
- गाड्या धुवायला बादलीत पाणी घ्या, नळीने पाणी मारू नका.
- दाढी करताना मगात पाणी घ्या, बेसिनचा नळ सुरू ठेवू नका.
- झाडांसाठी किंवा अंगणात सडा टाकाण्यासाठी बोअरवेलचे पाणी वापरा.