आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Savitribai Phule Scholarship Exam Issue In Nashik

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सराव नव्हे, ही तर सत्त्वपरीक्षा!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मुंबई येथील सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप अकॅडमीने सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये घेतलेल्या सराव परीक्षेदरम्यान रविवारी झालेल्या गोंधळामुळे चेंगराचेंगरी झाली. सुदैवाने या प्रसंगी विद्यार्थी शाळेतील वर्गामध्ये असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. आरडाओरडमुळे विद्यार्थी आणि पालकांना नेमके काय होतेय हे समजत नसल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. गोंधळ खूप वाढल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले यानंतर गोंधळ नियंत्रणात आला.

या अकॅडमीतर्फे इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबई व नाशिक येथे स्कॉलरशिप परीक्षा घेण्यात येतात. रविवारी (दि. 17) येथे अशोका मार्गावरील सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये शहरातील इंग्रजी माध्यमातील शाळेच्या चौथी व सातवीच्या विद्यार्थ्यांची सराव परीक्षा आयोजित करण्यात आली होती. अकॅडमीने प्रतिविद्यार्थी दीडशे रुपये यासाठी परीक्षा फी आकारली होती.अकॅडमी चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी 15 वर्षांपासून या परीक्षेचा उपक्रम राबविते. संस्थेच्या सुमती बर्डे ह्या परीक्षेचे नियोजन करतात. पुष्पा चव्हाण आणि चंद्रभान अहिरे हे नाशिक येथील स्कॉलरशिप परीक्षेचे समन्वयक आहेत.

प्रश्नपत्रिका इंग्रजीची आणि उत्तरपत्रिका सायन्सची : बाराशे विद्यार्थ्यांसाठी केवळ 13 वर्ग मिळाल्याने एका बाकावर चार-चार विद्यार्थ्यांना बसविण्यात आले. काही विद्यार्थ्यांना फरशीवर बसविण्यात आले. तरीही जागा अपुरी पडू लागल्याने विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर व्हरांड्यात बसविण्यात आले. विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीची आणि उत्तरपत्रिका सायन्सची देण्यात आली. ही बाब विद्यार्थ्यांच्याही लक्षात आली नाही.

संस्थेची अशी झाली कमाई

प्रति विद्यार्थी दीडशे रुपये फी आयोजकांनी गोळा केली. याप्रमाणे बाराशे विद्यार्थ्यांकडून एकूण एक लाख 80 हजार रुपये जमा झाले. यापैकी सॅक्रेड हार्ट हायस्कूलला पाचशे रुपये डिपॉझिट दिले. परीक्षेसाठी जास्तीत जास्त 80 हजार रुपये खर्च गृहीत धरला तरी आयोजक संस्थेला एक लाख रुपये निव्वळ नफा झाला असेल.

यामुळे झाली चेंगराचेंगरी

आयोजकांनी सॅक्रेड हार्ट हायस्कूल व्यवस्थापनाला परीक्षेसाठी केवळ आठ वर्गांची मागणी केली. मात्र, विद्यार्थ्यांची संख्या वाढल्याने आणखी वर्ग उपलब्ध करून देण्याची व्यवस्थापनाला विनंती केली. त्याप्रमाणे शाळेने एकूण 13 वर्ग उपलब्ध करून दिले. शाळेच्या क्षमतेपेक्षाही अधिक विद्यार्थी आणि पालक याठिकाणी आल्याने गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. इंग्रजी विषयाची परीक्षा सकाळी 11 ते 12, मॅथ्स व सोशल स्टडीज विषयाची परीक्षा 12.15 ते 1.15 आणि इंटेलिजन्स टेस्ट व जनरल सायन्स या विषयाची 1.30 ते 2.30 वाजता अशी होती. इंग्रजी प्रश्नपत्रिका पाऊण तास उशिरा आल्याने आयोजकांकडे पालकांनी गर्दी केल्याने चेंगराचेंगरीचा प्रकार शाळा आवारात घडला.

सराव परीक्षेतच इतका गोंधळ, अंतिम परीक्षेच्या वेळी काय होईल?

परीक्षेबाबत आम्ही कालपासून विचारणा करीत होतो. प्रत्येक विद्यार्थ्यास एक बाक हवे होते. मात्र, आयोजकांनी एका बाकावर चार विद्यार्थी बसवले. प्रशांत बडगुजर, पालक

मुलांना वेळेच्या पूर्वीच आणले होते. पण, परीक्षेबाबत कोणतेही ठोस निर्णय नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. पिण्यासाठी पाण्याची सोय नव्हती. छाया आंबेकर, पालक

सराव परीक्षेतच हा गोंधळ झाला तेव्हा अंतिम परीक्षा असती तर यांनी काय केले असते. यामध्ये शाळेची काही चूक नाही. शाळेने फक्त वर्ग दिले आहेत. भावना जानेराव, पालक

परीक्षेबाबत कोणतेही नियोजन नसल्याने संस्थेकडून पालकांची दिशाभूल करण्यात आली. व्हरांड्यात बसावे लागल्याने विद्यार्थ्यांचे हाल झाले. दिनेश चोपडा, पालक

आम्ही आयोजकांना परीक्षेतील गोंधळाबाबत सांगण्यास गेलो असता आमच्याशी हमरीतुमरी करण्यात आली. भाग्यर्शी वावीकर, पालक

शाळेचा एकही प्रतिनिधी नव्हता. शिक्षण विभागाचीही जबाबदारी आहे. मात्र, त्यांनी या बाबींकडे साफ दुर्लक्ष केल्याने परीक्षेत मोठा गोंधळ झाला. श्याम हांडोरे, पालक

परीक्षाच अनधिकृत

ही परीक्षा अनधिकृत आहे. पालकांचे प्रबोधन करूनही ही स्थिती आहे. विद्यार्थ्यांवर दबाव टाकून मुख्याध्यापकांनी अतिरिक्त परीक्षा घेण्याचे कारण नाही. उद्या माहिती घेऊन कार्यवाही करेन. शासनाची अधिकृत परीक्षा 23 मार्च रोजी आहे. नितीन उपासनी, प्रशासनाधिकारी, पालिका शिक्षण मंडळ

केवळ आठच वर्गांची मागणी

या संस्थेने आमच्याकडे केवळ आठ वर्गांची मागणी केली होती. विद्यार्थी जास्त झाल्याने आम्हीच पाच वर्ग अधिक दिले. भाडे घेतले नाही, केवळ 500 रुपये डिपॉझिट घेतले. सिस्टर बेट्टी जोस, सॅक्रेड हार्ट हायस्कूल

शाळेने नियोजन केले नाही

विद्यार्थी व शाळांना पूर्वीच परीक्षेबाबत कल्पना दिली होती. शाळेने नियोजन केले नाही. पुष्पा चव्हाण, परीक्षा समन्वयक

बाराशे विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने 16 वर्गांची मागणी केली. परंतु शाळेने 13 वर्ग दिले. चंद्रभान अहिरे, परीक्षा समन्वयक