आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Savitribai Phule University News In Divya Marathi

विद्यार्थी नाशिकचे, परीक्षा केंद्र पुण्याचे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गलथानपणाचा फटका एनबीटी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना बसला असून, ऑनलाइन परीक्षा अर्ज भरताना केंद्र निवडायचे असल्यास या विद्यार्थ्यांना पुण्याच्या डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पर्याय दाखवला गेला. याबाबत सतत चार दिवस पाठपुरावा केल्यानंतर विद्यापीठाने एनबीटी महाविद्यालयाचा परीक्षा केंद्र यादीत समावेश केला गेला आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या अर्जांवर पुण्याचा पत्ता आल्याने त्यांना समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.

ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा अर्जांवर डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा पर्याय आला आहे, त्यांचे अर्ज महाविद्यालयाने स्वीकारण्यास नकार दिला. हा प्रश्न घेऊन विद्यार्थी पुणे विद्यापीठाच्या विभागीय कार्यालयात गेले असता प्रथम त्यांना पुन्हा अर्ज भरण्याचा सल्ला देण्यात आला, तूर्तास वाट पाहून पुन्हा अर्ज भरायचे असल्यास प्रत्येकी ३० रुपये वाढीव शुल्कदेखील भरावे लागणार होते. यामुळे पैसे तर वाया जाणारच मात्र महाविद्यालयास याबाबत कोणतीही कल्पना नाही, आम्ही नाही तर विद्यापीठ यासाठी जबाबदार आहे, अशी उत्तरे महाविद्यालयाकडून मिळाली. या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला होता. सतत महाविद्यालय आणि विद्यापीठ विभागीय कार्यालयाच्या घिरट्या घातल्यानंतर विद्यापीठ संकेतस्थळावरील चूक सुधारण्यात आली. येत्या २० तारखेपर्यंत विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरून देण्यास सांगितले आहे. एवढे दिवस वाट पाहिल्यानंतर आता महाविद्यालयांतून अर्ज स्वीकारणार की नाही, हा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला होता.

एकाशून्याने केली गडबड : विद्यापीठउपकेंद्रामध्ये या प्रकाराबाबत विचारणा केली असता, डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे यांचा केंद्र क्रमांक ००६७ आहे, तर नाशिकच्या एनबीटी लॉ महाविद्यालयाचा केंद्र क्रमांक ०६७ आहे. एक शून्य बदलल्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर ही चूक घडल्याचे कारण असल्याचे सांगण्यात येत होते.

नेहमीचेच प्रकार, तक्रारींची लाज वाटते
-विद्यापीठाकडूनविधीच्याविद्यार्थ्यांसंदर्भात हे प्रकार नेहमीच घडतात. विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे केंद्र देण्यात आले. हा प्रकार हास्यास्पद आहे. महाविद्यालयही याबाबत कोणतीही माहिती नसल्याने उत्तर देऊ शकत नव्हते. आता तक्रार करायचीही लाज वाटू लागली आहे. विद्यापीठाकडून या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासही खूप वेळ घेतला गेला.
- चिन्मय गाढे, जीएस,एनबीटी लॉ कॉलेज

{ एनबीटी विधी महाविद्यालयाऐवजी डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे नाव.
{ विद्यार्थ्यांचे चुकलेले अर्ज स्वीकारण्यास महाविद्यालय तयार नाही, शुल्क भरणे सक्तीचे.
{ पुन्हा अर्ज भरायचे असल्यास प्रत्येकी ३० रुपये वाढीव शुल्क आकारणी.
{ तोडग्यापर्यंत अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांनी अर्ज भरले.
{ या समस्येविषयी कोणत्याही विद्यार्थ्याला काहीच सूचना दिल्या नाहीत.