आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sawarkars News In Marathi, Actor Performing Art On Sawarker, Divya Marathi

सावरकरांच्या पैलूंची अविस्मरणीय अनुभूती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- जयोस्तुते, अखिल हिंदू विजयध्वज हा, व्याघ्र-नक्र-सर्प-सिंह अशी स्फूरण चढविणारी गाणी एकापाठोपाठ एक सादर होत होती आणि थंडीने बहरलेल्या रात्रीही अंतर्मन पेटून उठत होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांची गीते, त्यांचा प्रवास, लढवय्या बाणा, मुत्सद्देगिरी या पलीकडेही एक हळूवार, अलवार मनाचे सावरकर होते तरी कसे, याचा शोध घेण्याच्या प्रयत्नात उलगडत गेलेला त्यांचा जीवनपट म्हणजे त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची एक अविस्मरणीय अशी अनुभूतीच होती.

शनिवारची रात्र अवघ्या नाशिककर रसिकांसाठी विशेष ठरली. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई व महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाड यांच्यातर्फे ‘शोध हा नवा शतजन्म शोधिताना..’ कार्यक्रमातील स्वर, नृत्य, नाट्य अशा आविष्कारांत रसिक दंग झाले होते.

स्वातंत्र्यवीर यापलीकडेही सावरकरांना अनेक बिरुदे लाभली. समरगीतांच्या बरोबरीनेच त्यांनी रचलेल्या लावण्या, भावगीते, नाट्यगीते, बालगीते यातून काही ना काही सामाजिक संदेश देण्याचाच त्यांचा प्रयत्न होता. ‘छंद नसे चांगला’ या रचनेतून पतीला बाहेरख्यालीपणा बरा नव्हे हे समजावून सांगणार्‍या पत्नीच्या भूमिकेत नर्तिका रूपाली देसाई यांनी, तर पतीच्या भूमिकेत सुशील यांनी रंग भरले.

त्यानंतर स्वातंत्र्यलक्ष्मी तू प्रसन्न हो. अशी साद घालत त्याला वीर बाजीप्रभूंच्या पावनखिंडीतील संग्रामावर आधारित पोवाड्याची जोड देत अत्यंत नेमका प्रभाव साधण्यात आला. अंजली आमडेकर यांनी ज्या पद्धतीने हा पोवाडा सादर केला ते पाहून काही क्षणांसाठी तर त्या युद्धभूमीवरच आपण आहोत अशी अनुभूती रसिकांनी अनुभवली. नंतर ‘तनुवेल’ हे भावगीत व सुकतातची जगी या नाट्यगीताचे सादरीकरण झाल्यानंतर रंगमंदिरातील नूरच पालटून गेला होता. उत्तरार्धात विविध नाट्यानुभवांसह, शतजन्म शोधिताना हे नाट्यगीत आणि शेवटी ‘ने मजसी ने परत मातृभूमीला.’ या गीताने रसिक हळवे झाले होते.

चित्रफीत ठरली लक्षवेधी
लंडनमधून सावरकर स्मारकाने मिळवलेली स्वत: सावरकर यांची चित्रफीत व त्यांच्या आवाजातील भाषण ऐकणे हा सुंदर अनुभव होता. नाशिकच्या भूमीत पुन्हा एकदा सावरकरांचा आवाज ऐकताना, त्यातील चैतन्य अनुभवताना प्रत्येकाच्याच अंगावर शहारा आला होता.

शिवाजी महाराजांवरील रचना
सावरकरांसाठी शिवाजी महाराज आराध्यदैवत होते. त्यांच्यावर रचलेली आरती, जयदेव जयदेव, हे हिंदू शक्तिसम भूतदीप्ती तम तेजा.. आदी गाणी सादर झाली. त्यासह त्यांनी खास लहानग्यांना आवडेल अशा पद्धतीने रचलेल्या चंद्र, सूर्य, सागराशी नाते सांगणारे ‘सुनील नभ हे.’ या गीतावर लहान मुलींनी नृत्य सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. संगीत सन्यस्तखड्ग आणि उत्तरक्रिया या नाटकांमधील प्रसंगांचे सादरीकरणही या वेळी करण्यात आले.

कार्यक्रमात वर्षा भावे, केतन पटवर्धन, सोमेश नार्वेकर, गीतिका मांजरेकर, सायली महाडिक व अवंती बपोरीकर यांनी गाणी सादर केली. अभिनेत्री रूपाली देसाई, अस्मिता केळुस्कर, गायत्री दीक्षित, प्राजक्ता भोसले, साक्षी बैचवाल, प्रशांत सुवर्णा, स्वप्नील कोरी, लक्ष्मण थोरात, अथर्व चव्हाण यांनी लाइव्ह व रेकॉर्डेड गाण्यांवर सुंदर नृत्याविष्कार सादर केले. संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचे होते. त्यांना सागर साठे, वरद कठापूरकर, अभिजित सावंत, हनुमंत रावडे यांनी वाद्यांची सुरेल साथ दिली.