आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मक्लेश : मागासवर्गीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी न्यायासाठी स्वत:ला कोंडून घेतले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंचवटी - आडगाव येथील समाजकल्याणच्या वसतिगृहात मूलभूत सुविधा नसल्याच्या निषेधार्थ रविवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. स्वत:ला कोंडून घेत त्यांनी वसतिगृहातच उपोषण सुरू केले. समाजकल्याण सहआयुक्त, पोलिस अधिकार्‍यांनी मध्यस्थी करत सुविधा आठ दिवसांत पुरवण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

आडगावला हजार मुली आणि हजार मुलांचे समाजकल्याणचे वसतिगृह आहे. नासर्डी पुलाजवळील वसतिगृहातील 200 मुलांचे स्थलांतर करण्यात आले. सुविधांविषयी गृहपाल फक्त आश्वासन देत होते. पाच महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. रविवारी त्याचा उद्रेक झाला. विद्यार्थ्यांनी कोंडून घेत सकाळी 9 पासून आंदोलन सुरू केले. ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला.

गृहपाल शशांक हिरे, रवींद्र पाटील यांनी सहआयुक्त वंदना कोचुरे, सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, पोलिस निरीक्षक डॉ. सीताराम केल्हे यांना आंदोलनाची माहिती दिल्यानंतर ते वसतिगृहात दाखल झाले. चर्चेनंतर विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे अधिकार्‍यांनी वसतिगृहाची पाहणी केली. त्यावेळी त्यांना अनेक समस्या दिसून आल्या.

सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेले काम निकृष्ट दर्जाचे असून, स्लॅब पडायला आला आहे. पाण्यासाठी कुठल्याही उपाययोजना नसल्याने समस्या निर्माण झाली. तक्रार केल्यास ‘रहायचे असेल तर रहा, नाही तर निघून जा’, असा दम गृहपाल देतात, अशी तक्रारही विद्यार्थ्यांनी केली. कोचुरे यांनी दोन वेळा टँकरने पाणीपुरवठय़ाच्या सूचना गृहपालांना केल्या. पोलिस निरीक्षक डॉ. केल्हे यांनी हजार लिटरची पाण्याची टाकी आणि पाणी तत्काळ उपल्बध करून दिले. आश्वासन मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन तत्काळ मागे घेतले. ज्ञानेश्वर बांगर, योगेश पाटील, मनोज अहिरे, किरण खरात, मुकेश बागले, सूरज पुरकर, आकाश कुर्‍हाडे, सचिन गरुड, दीपक गोरे, सचिन लोहकरे, र्शीकांत जाधवसह दोनशे विद्यार्थी उपस्थित होते.

या आहेत समस्या
सर्वत्र अस्वच्छता, शिळ्या अन्नाच्या ढिगार्‍यांचा दर्प, आंघोळीसाठी, शौचालयासाठी पाणी नाही, निकृष्ट फळे आणि जेवण, परीक्षा दोन महिन्यांवर असताना पुस्तके नाहीत, लाइट बंद, आश्वासनानंतर बससेवा नाही. जीव धोक्यात घालून पाटावर आंघोळ, स्मशानभूमीतून आणावे लागते पाणी, 9 महिन्यांपासून निर्वाह भत्ता नाही, सौर ऊर्जेवरील दिवे बंद, तुटलेले व्यायामाचे साहित्य, थंडीतही अंध- अपंग मुलांना झोपावे लागले लादीवर.

गृहपालांवर कारवाई करण्याचे आश्वासन
संबंधितांशी चर्चा करून निविदेतील तरतुदीप्रमाणे काम करण्याच्या सूचना दिल्या जातील. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची गंभीर दखल न घेणार्‍या गृहपालांवर कारवाई करण्यात येईल. वंदना कोचुरे, सहआयुक्त, समाजकल्याण