आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scholarship News In Marathi, Mathmatics, Divya Marathi

शिष्यवृत्ती परीक्षेचा गणितासह बुद्धिमत्तेचाही पेपर गेला अवघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गणिताचा पेपर मी अख्खा ढापलाच. हो. काय करणार. असे कुठे प्रश्न विचारतात का? किती अवघड! बुद्धिमत्ता चाचणीचाही तसाच होता; पण बरा होता..अशा प्रतिक्रिया देत चला जाऊ द्या पुढच्या पेपरचा अभ्यास करू, असा एकमेकांना धीर देत आपलं मन हलकं करण्याचा प्रयत्न करत विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षा दिली. मात्र, पेपर जरा अवघडच असल्याच्या प्रतिक्रिया पेपरनंतर आपापसांत बोलताना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने रविवारी इयत्ता चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली. राज्यभरात झालेल्या या परीक्षेस नाशकात चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सातवीच्या 30 हजार 238, तर चौथीच्या चार हजार 304 विद्यार्थ्यांनी परीक्षेस हजेरी लावली. तर, अनुक्रमे एक हजार 103 आणि एक हजार 561 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. त्यामुळे रविवार असतानाही शाळांचे आवार गजबजून गेल्याचे चित्र दिसत होते. विशेष म्हणजे, पालकांनीही आपल्या पाल्यांना पेपर चांगला जावा, अशी अपेक्षा व्यक्त करत तेवढाच वेळ शाळेच्या आवारात बसून काढला. प्रत्येक तासाच्या अंतराने संपलेला पेपर कसा गेला, किती लिहिले, काय लिहिले, याची खातरजमा करत होते.


एकाच दिवसात तीन पेपर : एकाच दिवसात तीन पेपर घेण्यात आले. प्रत्येक पेपरच्या वेळेत एक तासाचे अंतर होते. सकाळी 11 वाजेपासून ते दुपारी 4 वाजेदरम्यान पेपर झाले. त्यात सकाळी 11 ते 12 यादरम्यान मराठी व इंग्रजी हे पेपर झाले. 1 ते 2 वाजेच्या दरम्यान गणिताचा पेपर झाला, तर 3 ते 4 वाजेदरम्यान बुद्धिमत्ता चाचणीचा पेपर घेण्यात आला.


अडीच हजार विद्यार्थ्यांची दांडी : शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही वर्गाचे मिळून अडीच हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेस दांडी मारली. त्यात चौथीच्या 1561, तर सातवीच्या 31 हजार 341 विद्यार्थ्यांपैकी एक हजार 103 विद्यार्थ्यांनी पेपर दिला नाही.


निकाल लागल्यानंतरच काय ते कळेल
पेपर तसे इतके काही सोपे नव्हते. ठीक होते. गणिचाही पेपर बरा होता. परंतु, निकाल लागल्यानंतरच काय ते कळेल. पेपरमध्ये इतर कुठलीही समस्या नव्हती. प्रश्न आणि उत्तरपत्रिकाही ठीक होत्या. - समृद्धी शिंदे, विद्यार्थिनी

मुलांना धीर देणे महत्त्वाचे
तीन-तीन पेपर एकाच दिवशी आहेत. त्यात एक-एक तासाचे अंतर आहे. एवढा वेळ मुले कुठे थांबणार, शिवाय पेपर कसा असतो कसा नाही, त्यामुळे त्यांना धीर देणे महत्त्वाचे आहे. शिवाय, पेपरच्या वेळी काहीही घडलं? तरी शिक्षक आणि विद्यार्थीही पालकांनाच विचारतात. म्हणूनच येथे उपस्थित असलेलं बरं. - सुवर्णा नवले, पालक

481 केंद्रांवर झाली परीक्षा
सातवी आणि चौथी असे दोन्ही मिळून एकूण 481 केंद्रांवर परीक्षा झाली. त्यात सातवीसाठी 193, तर चौथीसाठी 288 केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती.

मी बाहेर थांबलोय
माझा पाल्य सातवीला आहे. यानंतर अशा परीक्षेच्या वेळी त्यांच्यासोबत शाळेत येण्याची शक्यतो संधी नाही. त्यामुळे मुलगा पेपर लिहितोय आणि मी दिवसभर बाहेर बसलो आहे. - राजेंद्र सोनी, पालक

मुलांची काळजी असते
मुलं पेपर कसा लिहितात, याची काळजी असते. मीही शिष्यवृत्तीची परीक्षा दिली होती; पण पास नाही झाले. म्हणून मला जे मिळाले नाही ते मुलांना मिळावं, हीच अपेक्षा आहे. हर्षदा निरगुडे, पालक