आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिष्यवृत्तीची अफवा; शिक्षण मंडळाकडे पालकांची गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उच्च माध्यमिक माध्यमिक निकालांच्या पार्श्वभूमीवर विशेष श्रेणीत उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. अब्दुल कलाम वाजपेयी यांच्या नावाने भरघोस शिष्यवृत्ती याेजना जाहीर केल्याची अफवा सध्या व्हाॅट्सअॅप आणि फेसबुक यांसारख्या साेशल मीडियावर पसरली आहे. त्यावर विश्वास ठेवून दहावी उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचे पालक महापालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयाकडे धाव घेत आहेत. त्यामुळे शिक्षण मंडळाची डाेकेदुखी वाढली असून, अशा प्रकारची काेणतीही याेजना महापालिकेत लागू नसल्याचा फलकच मंडळाने लावला आहे.

गल्लीतल्या कोपर्‍यापासून दिल्लीपर्यंत घडलेल्या घडामोडी, गोष्टी वा अन्य संदेश साेशल मीडीयाद्वारे क्षणार्धात शेकडो नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याने या माध्यमांवर विश्वास वाढला आहे. मात्र, फेसबुक, व्हॉट्सअॅप यांसारख्या सोशल मीडियावरून अनेकदा गैरसमज पसरविणारे संदेश पाठवून फसवणूक केल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत. अशाच प्रकारे आणखी एक संदेश काही दिवसांपासून व्हाॅट्सअॅप फेसबुकवर फिरत आहे. त्यात म्हटले आहे की, पंतप्रधान नरंेद्र मोदी यांनी डॉ. अब्दुल कलाम अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाने शिष्यवृ़त्ती सुरू केली असून, दहावीत ७५ टक्के गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांना दहा हजार रुपये बारावीत ८५ टक्के गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना २५ हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यासंदर्भातील अर्ज माहिती महापालिकेत मिळणार असल्याचेही या संदेशात म्हटले आहे.

‘व्हॉट्सअॅप’वर फिरणार्‍या या संदेशावर विश्वास ठेवून शहरासह ग्रामीण भागातून रोज विद्यार्थी पालक पालिकेच्या शिक्षण मंडळ कार्यालयात गर्दी करत आहेत. मात्र, अशी शिष्यवृत्ती नसल्याचे समजल्याने अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे, तर शेकडोंच्या संख्येने येणार्‍या पालक विद्यार्थ्यांना उत्तरे देताना शिक्षण मंडळाच्या नाकीनऊ आले आहेत.

दाेन दिवसांपूर्वी मिळाला संदेश
दोन दिवसांपूर्वी मोबाइलवर शिष्यवृत्तीबाबत संदेश आला हाेता. विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळणार असल्याने सकाळीच देवळाली कॅम्प येथून शिक्षण मंडळ कार्यालयात आले. मुशकरशेख, पालक

संदेश पुणे शहरातून...
केंद्र सरकारद्वारे शिष्यवृत्ती घोषित करण्यात आल्याचा संदेश व्हॉट‌्सअॅपवर पुणे येथून पाठविण्यात आला हाेता. त्याची माहिती घेण्यासाठी शिक्षण मंडळात आलो होतो. दिलीपविंचूरकर, पालक

अधिकृत माहिती जाणून घ्या...
शिष्यवृत्ती, योजना अथवा कोणत्याही प्रकारचा निर्णय मंजूर झाल्यास तसा शासन निर्णय (जी. आर.) जाहीर करण्यात येतो. त्यामुळे सोशल मीडियावर देण्यात येणार्‍या याबाबतच्या माहितीवर विश्वास ठेवू नये. - नवनाथ औताडे, शिक्षणाधिकारी, माध्यमिक विभाग

फलकावरील सूचनेमुळे जिल्हा परिषदेकडे धाव
महापालिकेच्या शिक्षण मंडळात चौकशीसाठी येणार्‍या पालकांना वैतागून कार्यालयाबाहेर फलक लावण्यात आला आहे. या फलकावर दहावी, बारावीच्या शिष्यवृत्तीबाबत शिक्षण मंडळाकडे चौकशी करता जिल्हा परिषदेकडे करावी, अशी सूचना देण्यात आली आहे. परिणामी सोशल मीडियावर आलेला संदेश खराच असेल यावर विश्वास ठेवून विद्यार्थी पालक जिल्हा परिषदेकडे धाव घेताना दिसून येत आहेत.
बातम्या आणखी आहेत...