आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिम्बाॅयसिस स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी दप्तर ठेवण्यासाठीच्या रॅक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जड दप्तराचा सर्वाधिक त्रास होत असून, पाठ दुखण्याचे आजार जडू लागले अाहेत. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर हलके करण्यासाठी शिक्षण विभागाने शाळांना सूचना दिल्यानंतर अनेक शाळांनी त्याला सकारात्मक प्रतिसादही दिला आहे. दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभिनव उपाय शोधले जात असतानाच सिम्बॉयसिस स्कूलनेही पुढाकार घेत दप्तर हलके करण्याचा निर्णय घेतला आहे. दप्तरातील वह्या पुस्तकांची संख्या कमी करण्यासाठी तासिकांमध्ये बदल केला जाणार आहे. तर, वर्कबुक, प्रयोग वही, निबंध वही यांसह पुस्तकांसाठी प्रत्येक वर्गात तीन रॅक चार कपाटे उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी शिक्षण विभागाने महिनाभरापूर्वी परिपत्रक काढले होते. दप्तर हलके करण्याची जबाबदारी संबंधित शाळेचे मुख्याध्यापक संस्थेच्या विश्वस्तांवर टाकण्यात आली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ३० नोव्हेंबरपर्यंत करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या दप्तरात २० ते ३० टक्के वजन अतिरिक्त वह्या-पुस्तकांसह इतर शालेय साहित्याचे असते. दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी शहरातील अनेक शाळांनी पुढाकार घेत उपाय शोधले आहेत. अश्विननगर येथील सिम्बॉयसिस स्कूलमध्ये एकूण १५०० विद्यार्थी आहेत. या शाळा व्यवस्थापनाने दप्तर हलके करण्यासाठी प्रत्येक वर्गात वह्या पुस्तकांसाठी तीन रॅक चार मोठी कपाटे उपलब्ध करून दिली आहेत.

दप्तराची तपासणी करू
^दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी पालक शिक्षकांची बैठक घेऊ. मुख्याध्यापिका एस. सबरवाल आणि योगिनी देशमुख यांना सूचना देऊन काही विद्यार्थ्यांच्या दप्तराची तपासणी केली जाईल. अनावश्यक वह्या पुस्तके शाळेत ठेवण्याची सुविधा आहे. - डॉ. सी. आर. पाटील, व्यवस्थापन समिती सदस्य तथा समन्वयक, सिम्बॉयसिस स्कूल

लॉकर सुविधा हवी
^शाळेने प्रत्येक वर्गात विद्यार्थ्यांच्या वह्या पुस्तके ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून दिल्यास मुलांना दररोज शालेय साहित्याची ने-आण करण्याची गरज राहणार नाही. जड दप्तराने मुलांना पाठीचे आजार जडण्याची शक्यता असते. त्यामुळे दप्तर हलके करण्याचा निर्णय याेग्य अाहे. नलिनी कुलकर्णी, पालक