आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता दप्तरात आणा फक्त तीन वह्या, तीन पुस्तके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दप्तरात प्रत्येक विषयाचे पुस्तक नाही तर मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा विषयांची पुस्तके आणि एका वहीमध्ये दोन विषयांचे लेखन. यामुळे दप्तरात तीन वह्या आणि तीनच पुस्तके असतील. तसेच, पाण्याची बाटली, इतर शालेय साहित्य, स्वाध्याय वह्या आठवड्यातून एकदाच शाळेत आणायच्या. प्रयोगवही निबंध वही शाळेतच ठेवल्या जाणार आहेत. विविध शाळांमधून अशा विविध कल्पनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तर हलके हाेणार अाहे.
‘दिव्य मराठी’ने अावाहन केल्यानंतर काही शाळांनी संपर्क साधत अापल्या कल्पना व्यक्त करत त्या अमलात अाणणार असल्याचेही सांगितले. डझनभर वह्या-पुस्तके, पाण्याची बाटली, इतर साहित्य अशा भरगच्च शालेय साहित्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे हलके करण्यासाठी आता अनेक मोठ्या शैक्षणिक संस्थांच्या शाळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मराठा हायस्कूल, अभिनव बाल विकास मंदिर, रंगूबाई जुन्नरे विद्यालय या शाळांनीही दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी अभिनव उपाय शोधत वह्या-पुस्तकांची संख्या निम्म्याहून अधिक प्रमाणात घटवण्याचा निर्णय घेतला आहे. एम. एस. कोठारी शाळेने दप्तर हलके करण्यासाठी राबविलेला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर आता रंगूबाई जुन्नरे शाळेतही तसाच प्रयोग राबविला जाणार आहे.

जड दप्तरामुळे मुलांना शाळेत ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. पाठीचे दुखणे वाढण्यास जड दप्तर कारणीभूत ठरल्याचे समोर आल्याने दप्तर हलके करण्यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत दप्तर हलके करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले होते. शहरातील काही शाळांनी या संदर्भात पहिले पाऊल टाकल्यानंतर "दिव्य मराठी'ने विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन संस्थाचालकांच्या, शाळांच्या अाणि शिक्षकांच्या समन्वयातून शाळांना आवाहन केले होते.

दिलासा १० हजार विद्यार्थ्यांना
मराठा हायस्कूलमधील ४५००, अभिनव बाल विकास मंदिर- ३५००, एम. एस. कोठारी शाळा - ४५० आणि रंगूबाई जुन्नरे शाळेत १८०० विद्यार्थी आहेत. दप्तराचे वजन ३० ते ४० टक्के कमी होणार असल्याने या सर्व शाळांमध्ये दहा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.

दप्तरात एकच वही
^परिपत्रक येण्यापूर्वीच कोठारी शाळेत आम्ही वह्या-पुस्तकांची संख्या घटवण्याचा प्रयोग राबवला. त्यानंतर शिक्षण विभागाच्या सूचनांनुसार रंगूबाई जुन्नरे शाळेतही विद्यार्थ्यांसाठी हलक्या दप्तराचा प्रयोग राबविण्यात येईल. प्रा. दिलीप फडके, उपाध्यक्ष,नाशिक एज्युकेशन सोसायटी
शाळांनीच विविध कल्पना अाणल्या पुढे
प्रचंड अभ्यासाचं मानसिक अाेझं अाणि ताे पूर्ण करण्यासाठी पाठीवर असलेलं दप्तराचं अाेझं. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील हे अाेझं हलकं व्हावं, अशी पालकांची मनापासून इच्छा अाहे. किंबहुना, न्यायालयानेही विद्यार्थ्यांचे दप्तर कमी करा, अशा सूचना केल्या अाहेत. तसेच, अनेक डाॅक्टरांनीही त्यावर टिप्पणी करत हे वजन कमी करण्याची गरज अधाेरेखित केली अाहे. विद्यार्थ्यांचे हेच दप्तर हलकं करण्यासाठी अाता ‘दिव्य मराठी’ पुढाकार घेत अाहे. शहरातील शाळा-शाळांमध्ये जाऊन संस्थाचालकांना यासंदर्भात सविस्तर विचारणा करण्यात येणार असून, अापल्या संस्थेत न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी झाली का, किती अाेझे कमी झाले? जर भविष्यात दप्तराचे अाेझे कमी करणार असेल तर किती दिवसांत...! अशा सर्व बाबींवर शाळा संस्थाचालकांच्या समन्वयातून विद्यार्थ्यांचे अाेझे कसे कमी हाेईल, यासाठी प्रयत्न करण्यात येणार अाहे. यासंदर्भातील ‘दिव्य मराठी’ची ठाेस भूमिका अाजपासून देत अाहाेत. या विषयी संस्थाचालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांचेही काही नवीन प्रयाेग असतील तर त्यांनीही अामच्या प्रतिनिधीशी ९०२८७०१९७३याक्रमांकावर संपर्क साधावा.