आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गैरसोय, उशीर अन् संताप; आरटीओच्या कारवाईमुळे रिक्षा, व्हॅनचालकांचा अचानक बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नियमबाह्य व असुरक्षित विद्यार्थी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांविरुद्ध प्रादेशिक परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेताच त्याविरोधात रिक्षा, जीप, व्हॅन चालकांनी शुक्रवारी अचानक वाहतूक बंद ठेवली. यामुळे किमान 40 हजार पालकांची गैरसोय झाली. ऐनवेळी झालेल्या या गोंधळामुळे पालकवर्गाने प्रचंड संताप व्यक्त केला.
चार दिवसांपूर्वी सिडकोत स्कूलबसच्या धडकेने बालवाडीतील विद्यार्थी ठार झाल्याच्या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर परिवहन विभाग आणि वाहतूक पोलिसांनी स्कूलबसेस, रिक्षा, व्हॅनविरोधात हाती घेण्यात आलेल्या मोहिमेत बहुतांशी बसेसला स्पीड गव्हर्नर नसल्याचे आणि व्हॅन, रिक्षांमध्ये क्षमतेच्या तिप्पट मुले कोंबले असल्याचा व विनापरवानगी वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. परंतु, या कारवाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादीप्रणीत श्रमिक रिक्षा, टॅक्सी चालक-मालक सेनेच्या सभासद असलेल्या वाहनधारकांनी अचानक विद्यार्थी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. याबाबत काही पालकांना गुरुवारी रात्री 10 वाजेनंतर चालकांनी बंदबाबत कळविले, तर काही पालकांनी सकाळी नियमित वेळेत रिक्षा व व्हॅन न आल्याने चालकांशी मोबाइलवर संपर्क साधला असता त्यांनी बंदबाबत सांगितले. यामुळे बहुतांशी पालकांचा पहाटेपासूनच दिनक्रम विस्कळित झाला. यामुळे पालकांनी संताप व्यक्त केला.

कल्याण-डोंबिवलीत जनमताच्या रेट्यापुढे झुकले रिक्षाचालक
मुंबईतील डोंबिवली, कल्याण परिसरात जनमताच्या रेट्यापुढे रिक्षाचालकांना झुकावे लागले होते. मीटर बसवण्याची आग्रही मागणी करत नागरिकांनी प्रसंगी आंदोलनेही केली. राज्य शासनाच्या आदेशांबरोबरच लोकांचाही यात मोठा पुढाकार होता. अवास्तव भाडे आकारणीविरोधात वेगवेगळी आंदोलने झाली. डोंबिवली एमआयडीसी परिसरात तर सलग तीन दिवस नागरिकांनी रिक्षांवर बहिष्कारच टाकला होता. शहरबस किंवा अन्य वाहनांनी त्या काळात नागरिक प्रवास करत होते, मात्र रिक्षात पाऊलही ठेवले नाही. रिक्षाला मीटर हवेच, अशा मागणीची अनेक निवेदने नागरिकांनी विविध माध्यमांतून राज्य शासनापर्यंत पोहोचवली. केवळ डोंबिवली, कल्याण नव्हे तर अन्य उपनगरांतूनही नागरिकांचा रिक्षाचालकांविरोधातील वाढता रोष लक्षात घेता, अखेर रिक्षाचालक नामोहरम झाले व मीटरप्रमाणे भाडे आकारणी सुरू झाली.

परिवहन कार्यालयावर मोर्चा
परिवहन विभागाविरुद्ध श्रमिक राष्ट्रवादी सेनेचे संस्थापक सुनील बागुल व कार्याध्यक्ष भगवंत पाठक यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 300हून अधिक रिक्षा, व्हॅनचालक सहभागी झाले होते. अधिकार्‍यांना खालीच बोलविण्याची मागणी केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. अखेरीस बागुल यांनीच शिष्टमंडळासह कार्यालयात जाऊन परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांच्याशी चर्चा केली.

मोर्चातील रिक्षाचालकाचा हृदयविकाराने मृत्यू
प्रादेशिक परिवहन कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चातील रिक्षाचालक चंद्रशेखर फटांगरे (35) यांना मोर्चा संपल्यावर घरी जाताना छातीत दुखू लागले. त्यांच्या मित्रांनी त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. फटांगरे हे सिम्बॉयसिस विद्यालयात सिडको, इंदिरानगरसह परिसरातील विद्यार्थ्यांची वाहतूक करायचे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.