आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक आरटीओ तपासणार शालेय वाहने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोमध्ये एका पाच वर्षीय विद्यार्थ्याचा शाळेच्या बसखाली सापडून अपघाती मृत्यू झाला. या घटनेची आरटीओने (प्रादेशिक परिवहन विभाग) गंभीर दखल घेतली असून, शालेय वाहनांची तपासणी मोहीम सुरू करणार असल्याचे परिवहन अधिकारी जीवन बनसोड यांनी सांगितले.

शालेय वाहतूक करणारे स्कूलबस कंत्राटदार आणि शाळा व्यवस्थापन यांच्यामध्ये समन्वय नसल्याने स्कूलबसचे अपघात घडत आहेत. भविष्यात असे अपघात टाळण्यासाठी शालेय वाहतूक करणार्‍या वाहनचालकांना आणि शाळा व्यवस्थापनास आरटीओच्या नियमांच्या अधीन राहूनच काम करावे लागेल, असेही या विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

स्कूलबस सुरक्षितता समिती : शालेय विद्यार्थी सुरक्षेसाठी जिल्हा स्कूलबस सुरक्षितता समिती स्थापली असून, पोलिस आयुक्त व अधीक्षक समितीचे अध्यक्ष आहेत.

शालेय प्रशासनाच्या जबाबदार्‍या : परिवहन समितीची बैठक तीन महिन्यांतून किमान एकदा घ्यावी, शाळेतील मुलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मुख्याध्यापक जबाबदार, रोज विद्यार्थी वाहतुकीवर लक्ष ठेवावे, सक्षम वैद्यकीय अधिकार्‍यांकडून चालकाचे आरोग्य प्रमाणपत्र घ्यावे, बसमध्ये महिला सहवर्ती असावी, विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे उतरवण्यासाठी जागेची तरतूद करावी.

स्कूलबस कंत्राटदारांच्या जबाबदार्‍या : ओळख दर्शविणारे फलक असावेत, स्कूलबसमध्ये चढण्याची पायरी 300 मि.मी.पेक्षा अधिक उंच नसावी, धोक्याचे इशारे देणारी यंत्रणा असावी, वेग नियंत्रक असावे, चालकाने परवाने बाळगावे.

चालकाचे कर्तव्य : क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवू नयेत, योग्य थांब्यावर विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू द्यावे व उतरावे, विद्यार्थी बसमध्ये चढल्याची व उतरल्याची खात्री केल्यानंतरच बस सुरू करावी, वाहकाने खाली उतरून मागे व पुढे कोणी नसल्याची खात्री करावी.