आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक: चालकांची मनमानी, पालकांवर आणीबाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- महिन्याला एकदम पैसे मिळत असल्यामुळे बंदचा पुरेपूर फायदा उचलत रिक्षावाल्या‘काकांनी’ विद्यार्थी वाहतुकीला टाटा केला खरा; मात्र बंदविरोधात निषेध करण्याचे सोडून हेच काका खासगी प्रवासी वाहतुकीतून कमाईत व्यस्त असल्यामुळे पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.


शहरातील प्रमुख शाळांकडून बस सुविधा पुरवली जात असली तरी ही सेवा गल्लीबोळात जात नसल्यामुळे पालकांकडून खासगी रिक्षा व मारूती व्हॅनसारख्या पर्यायांचा वापर केला जात आहे. आधीच महिन्यात नियमित सुट्यांचा अपवाद वगळता अन्य कारणामुळे तीन ते चार दिवस रिक्षाचालक काका बुट्टी मारत असल्यामुळे विद्यार्थ्यांना आपसूकच सुटी मिळते. त्यात बंद वा संपाची बातमी आल्यानंतर तातडीने सुटी घेण्याचे प्रकार वाढले आहेत. सुटी घेतल्यानंतर नियमित मासिक शुल्कातून त्याची कोणतीही कपात होत नसल्यामुळे पालकांमधील रोष वाढत चालला आहे. शुक्रवारी असाच प्रकार अनुभवास आला. रिक्षाचालक संघटनांनी बंद नसल्याचे सांगितले तरी प्रत्यक्षात मात्र शालेय वाहतूक करणार्‍या रिक्षाचालकांनी सुटी घेऊन पालकांना वेठीस धरले. विशेष म्हणजे, यातील अनेक रिक्षा खासगी प्रवासी वाहतूक करताना पालकांना दिसल्या.

‘अभिनव’मध्ये 253 मुलांची दांडी
गंगापूररोडवर मविप्रचे अभिनव बालविकास मंदिर असून, रिक्षाचालकांच्या संपामुळे जवळपास 253 मुलांना दांडी मारावी लागली. जवळपास पाचशेहून अधिक मुलांना सोडवण्यासाठी पालकांची तारांबळ सुरू होती.

तज्ज्ञ काय म्हणतात..
> विद्यार्थ्यांच्या दप्तरासाठी वाहनांमध्ये कॅरियर बसवावे.
> वाहनांमधून कमीत कमी विद्यार्थ्यांची वाहतूक करावी
> वाहन आल्यानंतर घाई करण्यापेक्षा पालकांनी पाल्याची आधीच तयारी करावी
> वाहनचालकांनी निर्धारित वेळेपेक्षा किमान 15 ते 20 मिनिटे आधी निघावे
> वाहन चालवितांना भ्रमणध्वनी बंद ठेवला पाहिजे
> वाहनाच्या पाठीमागे ‘विद्यार्थी वाहतूक’ असे ठळक लिहावे
> ब्लाईंड स्पॉट पाहण्यासाठी वाहक असलाच पाहिजे. त्याच्याकडे शिटी असावी.

विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य
श्रमिक सेनेच्या पदाधिकार्‍यांनी मागण्यांबाबत चर्चा केली असली तरी बहुतांशी मागण्या शासनस्तरावरील असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्याचबरोबर नियमबाह्य कारवाई होणार नसून अवैध विद्यार्थी वाहतुकीवर व मीटर नसल्यास कारवाई केलीच जाईल. विद्यार्थी सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात येईल असे सांगण्यात आले.
-जीवन बनसोड, परिवहन अधिकारी

शिक्षणाधिकारी घेणार सोमवारी बैठक
सिडकोत बसखाली चिरडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या पाश्र्वभूमीवर शिक्षणाधिकारी सोमवारी (दि. 8 ) सर्व शाळांतील मुख्याध्यापकांची हजेरी घेणार आहेत. सिडकोतील घटनेनंतर शिक्षण खाते जागे झाले असून, प्रत्येक शाळेकडून विद्यार्थी वाहतुकीची माहिती मागविण्यात आली आहे. शहरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मुख्याध्यापकांना व प्राचार्यांना ‘मविप्र’च्या रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी 11.45 वाजता होणार्‍या सहविचार सभेसाठी बोलाविण्यात आले आहे. शहरबसने प्रवास करणारे विद्यार्थी, त्यांचे मार्ग तसेच वेळ याची माहिती मागविण्यात या सभेसाठी मागवली आहे. शहर बससेवेने ये-जा करण्यासाठी आवश्यक असलेल्या बसेसच्या मागणीवरही या सभेत चर्चा होणार आहे असे माध्यमिक शिक्षणाधिकारी एन. बी. औताडे यांनी सांगितले.

पालकांचाही पाठिंबा
रिक्षा व व्हॅनचालकांनी वित्त संस्थांकडून कर्ज काढून व्यवसाय सुरू केला आहे. यंत्रणेच्या कारवाईमुळे त्यांचा उदरनिर्वाह संकटात आला आहे. या बंदमुळे पालकांना मनस्ताप झालेला नसून त्यांनीही चालकांना पाठिंबा दिला आहे. पाठलाग करून कारवाईमुळे दहशत पसरली आहे. त्याविरोधात चालकांनीच स्वयंस्फूर्तीने बंद ठेवला. सुनील बागुल, राष्ट्रवादी श्रमिक सेना संस्थापक

विद्यार्थी सुरक्षेसाठी कारवाई सुरूच ठेवणार
मागण्या मान्य करताना परिवहन विभागाने कायद्यातील तरतूदींनुसार काही अटींचेही बंधने घालून दिली आहेत. यात विद्यार्थी वाहतूक करणार्‍या जीप, व्हॅन यांना पिवळा रंग द्यावा लागणार असून, विद्यार्थी वाहतूक परवाना काढणे सक्तीचे केले आहे. मात्र अटींचे पालन न केल्यास संबंधीत वाहन जप्त करुन वाहनचालकांवर कारवाई करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.

75 टक्केच उपस्थिती
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बहुतांश सर्वच वाहनचालकांनी वेळीच पालकांना माहिती दिली नाही तर दुसरीकडे पाल्यांना पोचविण्याची कोणतीच सोय नसल्याने अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेतच धाडले नाही. यामुळे बहुतेक शाळांमध्ये केवळ 75 टक्केच विद्यार्थ्यांची उपस्थिती दिसून आली.

फेब्रुवारीतही झाला होता संप
3 फेब्रुवारी 2013 रोजीही असाच रिक्षाचालकांनी विविध मागण्यांसाठी पुकारला होता. त्यावेळी 80 हजार विद्यार्थ्यांची वाहतूक ठप्प झाली होती. 40 हजार विद्यार्थ्यांची खासगी वाहनाद्वारे वाहतूक करण्यात आली होती. तब्बल 20 हजार पालकांची वाहने रस्त्यावर उतरली होती. 400 वाहनचालकांनी मोर्चात सहभाग घेतला होता.

सुरक्षित विद्यार्थी वाहतुकीसाठी प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा धडाका लावताच संबंधित रिक्षा व व्हॅनचालकांनी शुक्रवारी अचानक संप पुकारला. कारवाईच्या विरोधात आरटीओ कार्यालयावर मोर्चाही काढण्यात आला. दरम्यान, वाहनचालकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने शहरातील सुमारे चाळीस हजार पालकांना दैनंदिन कामे बाजूला ठेवत पाल्यांना शाळेत पोहोचविण्याचे व घेऊन येण्याचे काम करावे लागून त्यांचा संपूर्ण दिनक्रमच बिघडला. प्रचंड मनस्तापही सहन करावा लागला.