आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळांमध्ये अंशत: बदल करून एस. टी. महामंडळाला पत्राने दिलेल्या आदेशाला किरकोळ प्रतिसाद मिळाल्याने नवीन शैक्षणिक वर्षात नियोजन करावे तरी कसे, असा प्रश्न महामंडळाला पडला आहे. केवळ दोन शाळांच्या मुख्याध्यापकांनी महामंडळाला पत्र पाठवून शाळेच्या सुधारित वेळा कळवल्या आहेत. त्यामुळे शाळा व्यवस्थापनाच्या अनास्थेमुळे विद्यार्थ्यांना यावर्षीदेखील खस्ता खाव्या लागण्याची शक्यता आहे.
महामंडळाच्या शहर बससेवेमार्फत दररोज सुमारे 70 ते 80 हजार विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. मात्र, सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात विद्यार्थी व अन्य प्रवाशांची एकदमच गर्दी होत असल्याने विद्यार्थी बसच्या दरवाज्यात लोंबकळलेल्या अवस्थेत उभे दिसतात. त्यामुळे आतापर्यंत चार-पाच विद्यार्थ्यांचा नाहक बळी गेला असून, हात निसटून खाली पडल्याच्या शेकडो घटना घडल्या आहेत.
विशेषत:, मध्यवर्ती बसस्थानक, जिल्हा न्यायालयासमोर, शासकीय कन्या विद्यालय, मेहेर चौक, रविवार कारंजा, अशोकस्तंभ, पंचवटी कारंजा या भागात विद्यार्थ्यांना बसेसच्या मागे धावत जाऊन गाड्या पकडाव्या लागतात. यातून विद्यार्थ्यांची मुक्तता करण्यासाठी खुद्द पालकमंत्री भुजबळ यांनी पुढाकार घेत शिक्षणाधिकारी, प्रादेशिक परिवहन विभाग, राज्य परिवहन आणि वाहतूक पोलिसांची बैठक घेतली होती. शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळा पाच ते 15 मिनिटे मागे-पुढे केल्यास विद्यार्थी वाहतूक निश्चितपणे सुरळीत होऊ शकते, असा विश्वास व्यक्त करीत त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचीही सूचना केली होती.
माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकार्यांनी मार्चमध्ये यासाठी स्वतंत्रपणे मुख्याध्यापकांच्या बैठका घेऊन नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्याच्या आठवडाभर आधी, म्हणजे 10 जूनपर्यंत शाळांनी महामंडळाला वेळा कळवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, उन्हाळी सुट्यांनंतर शाळा सुरू होण्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिले असतानाही केवळ रचना आणि नवरचना विद्यालयाचेच पत्र महामंडळाकडे आले आहे. त्यामुळे यंदाही पूर्वीप्रमाणेच शहरवासीयांना विद्यार्थ्यांची जीवघेणी कसरत पाहावयास मिळण्याची शक्यता आहे.
प्रतिसाद नसल्याने नियोजनात अडसर
10 जूनपर्यंत वेळांमधील बदलाची माहिती कळवण्यास सांगण्यात आले होते. ही माहिती मिळाली असती तर त्यानुसार विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बसेसचे नियोजन करता आले असते. अजूनही चार दिवस शिल्लक आहेत. शाळांनी तातडीने माहिती द्यावी. त्यानुसार बसेसचे वेळापत्रक ठरवता येईल. यंदा पुरेसे चालक-वाहक उपलब्ध झाल्याने मोठय़ा संख्येने बसेस सोडण्यात येणार असल्याने तशीही फारशी अडचण येणार नाही. कैलास देशमुख, विभागीय नियंत्रक
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.