आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहपाठाचा न येई कंटाळा, शिक्षेचेही स्वरूप बदलले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गृहपाठ म्हटला की, शालेय विद्यार्थ्यांच्या कपाळावर आठ्या येतात आणि शाळा नकोशी वाटायला लागते. शिवाय गृहपाठ केला नाही तर पायाचे अंगठे धरून वर्गाबाहेर उभे राहणे, कोंबडा करणे, ग्राऊंडला पाच फे-या मारणे या शिक्षादेखील विद्यार्थ्यांना शाळा बुडविण्यास भाग पाडतात. पण या गृहपाठाचे आणि शिक्षेचे स्वरूप बदलले आहे, असे शहरातील शाळांच्या निरीक्षणावरून लक्षात आले आहे.
छडीचा गेला जमाना - ‘गृहपाठ नाही केलास, घे डाव्या हातावर छडी...’ असे मोठ्याने म्हणत मारणारे मास्तर वा बाई आता अभावानेच शाळेत दिसतात. त्याऐवजी आहे तोच गृहपाठ पुन्हा लिही, खेळाच्या तासाला खेळायला न जाता त्यावेळात आणखी गृहपाठ करवून घेणे, अशा साध्या साध्या पद्धती अवलंबवल्या जातात. प्रत्येक शाळेमध्ये हल्ली बालमानसशास्त्राचा त्याकरता विचार केला जाऊ लागला आहे.
स्व-अभ्यास महत्त्वाचा - गृहपाठापेक्षा स्व-अभ्यासावर अनेक शाळांमध्ये भर दिला जातो. काही शाळांमध्ये स्वाध्यायातील गणितांवरून गणिते तयार करावयास विद्यार्थ्यांना सांगितले जाते. माध्यमिक शाळांमध्ये (विशेषत: आठवी व नववीत) हा प्रयोग केला जातो. तसेच मुलांनी स्वयंप्रेरणेने स्वत:च अभ्यास करावा व वेगळ्या वहीत त्याच्या नोंदी कराव्यात, असेही सांगितले जाते.
मुलांच्या क्षमतेचे मूल्यमापन व्हावे - गृहपाठ कसा द्यावा व करवून घ्यावा, याकरता शासनाकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. त्याबरोबरच मुलांच्या क्षमतेचे योग्य मूल्यमापन करूनच त्यांना दिल्या जाणा-या गृहपाठाचे स्वरूप ठरवणे अधिक उचित आहे. - सुनील गायकवाड, पर्यवेक्षक, नवरचना माध्यमिक विद्यालय
पालकांचा सहभाग हवा - मुले गृहपाठ, स्व-अभ्यास करतात का, कसा करतात याबाबतीत पालकांनीच त्यांच्या गृहपाठ करण्यामध्ये सहभागी व्हायला हवे. वेळोवेळी मुले काय करतात हे तपासायला हवे. - व्ही. के. भामरे, मुख्याध्यापक, अभिनव बालविकास मंदिर, प्राथमिक विद्यालय
ढीगभर वह्या-पुस्तके नको, मोजकेच दप्तर हवे - अभ्यासाचे महत्त्व समजावे, सकारात्मक दृष्टिकोन वाढावा याकरता पूर्वीसारखे आता दप्तराचे ओझे मुलांवर लादले जात नाही. गृहपाठाच्या वह्या, प्रयोगवह्या शाळेतच जमा केल्या जातात. दिवसातल्या 6-7 तासांमध्ये भाषा विषयाची व समाजशास्त्राची पुस्तके फक्त अनिवार्य केली जातात. एका बेंचवर दोन विद्यार्थी बसत असताना विज्ञानाचे, गणिताचे पुस्तक दोघांनी आलटून-पालटून आणायचे, अशी पद्धत ठरवली जाते. गृहपाठ देखील सुटसुटीत दिला जातो. ढीगभर प्रश्न, गणितांपेक्षा, घोकंपट्टीपेक्षा ठरावीक पण सूक्ष्म प्रश्नावली, वस्तुनिष्ठ प्रश्नांचा अवलंब गृहपाठ देताना केला जातो.