आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्याध्यापक नियुक्ती होईपर्यंत शाळा बंदच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगाव - तीन वर्षांपासून शाळेतील रिक्त तीन जागांवर जिल्हा परिषदेकडून शिक्षक मिळत नसल्याने चालू शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभीच देवघट येथील ग्रामस्थांनी प्राथमिक शाळेला कुलूप ठोकले. याची दखल घेत तातडीने दोन शिक्षक नियुक्त करण्यात आलेले असले तरी मुख्याध्यापकाबाबतचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे ग्रामस्थ आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आठवडाभराचा कालावधी उलटूनही शाळेचे कामकाज ठप्प आहे.

देवघट प्राथमिक शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग भरतात. परंतु, गेल्या काही वर्षांपासून येथील शिक्षकांच्या रिक्त पदांवर नव्याने शिक्षक देण्यात आले नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याविषयी वारंवार तक्रारी करणा-यांची केवळ आश्वासनांवर बोळवण केली जात आहे. नूतन शैक्षणिक वर्षात तरी रिक्त जागांवर शिक्षक नियुक्त होतील, अशी आशा पालक व ग्रामस्थांना होती. मात्र, सर्वांचा भ्रमनिरास झाला. मुख्य शिक्षक नसताना विद्यार्थी मात्र दररोज शाळेत जात होते. याची गंभीर दखल घेत 27 जून रोजी सरपंच देवचंद दळवी यांच्या नेतृत्वाखाली रमेश देसले, विश्वासराव पगार, दामोधर देसले, वीरेंद्र जाधव, रोहित जाधव, छोटू दुसाने, अशोक जाधव, विजय पगार यांनी शाळेच्या प्रवेशद्वारालाच कुलूप ठोकले.

पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांच्या आदेशाने विस्तार अधिकारी दिलीप पवार यांनी ज्येष्ठ नेते बाबूराव पगार यांच्यासह पालकांशी चर्चा केली. परंतु, ग्रामस्थांनी शिक्षक रुजू होईपर्यंत शाळा बंदच ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली. या दिवसापासून विद्यार्थी अघोषित सुटीवर, तर शाळा आठ दिवसांपासून कुलूपबंद आहे. दरम्यान, एक पदवीधर शिक्षक देण्याचा प्रयत्न पंचायत समितीतर्फे करण्यात आला, परंतु ग्रामस्थांनी आंदोलनात तडजोड केली नाही. जोपर्यंत रिक्त जागांवर प्रत्यक्ष शिक्षक रुजू होत नाहीत, तोपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचा निर्णय पालकांनी जाहीर केल्याने पंचायत समितीची कोंडी झाली आहे.
पाच वर्षांपासून चार वर्गांची जबाबदारी एकाच शिक्षकाकडे
जिल्हा परिषदेच्या चापापाडा येथील प्राथमिक शाळेत पाच वर्षांपासून एकच शिक्षक आहे. त्यामुळे रिक्त पदावर शिक्षकाची त्वरित नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सरपंच व नागरिकांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर शिरसाठ यांच्याकडे केली आहे.
सर्वशिक्षा अभियान, शिक्षणाचा अधिकार आदींच्या माध्यमातून प्राथमिक शिक्षणापासून कोणी वंचित राहू नये, यासाठी शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. त्यास वाटाण्याच्या अक्षता लावण्याचे काम कळवण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. चापापाडा येथील पहिली ते चौथीच्या कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांपैकी एका शिक्षकाचे पद पाच वर्षांपासून रिक्त ठेवण्यात आले आहे. याबाबत चौकशी सुरू असून, ही चौकशी पूर्ण न झाल्याने या शाळेला नवीन दुसरा शिक्षक मिळालेला नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. आदिवासी भागात आधीच निरक्षरतेचे प्रमाण जास्त असताना शाळेत पोहोचणा-या विद्यार्थ्यांनाही शिक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. एक शिक्षक एकाच वेळी चार वर्गांना शिक्षण देण्यात असमर्थ ठरत आहे. तसेच, प्रशिक्षण अथवा बैठक असल्यास त्या दिवशी शाळेला अघोषित सुटीच जाहीर होते. त्यामुळे या शाळेवर तत्काळ शिक्षक नेमावा, अशी मागणी सरपंच जगन गवळी, रमेश कवर, सुभाष गांगुर्डे, तुकाराम गवळी, काशीनाथ भोये, हेमराज हाड्स, कृष्णा गांगुर्डे, सीताराम पवार, आनंदा गांगुर्डे, गुलाब गवळी, देवराम गवळी, भावराव गावित, शिवनाथ गावित, सदू गवळी, पंडित पवार आदींनी केली आहे.
शिक्षक परागंदा
- चापापाडा येथील शिक्षक 2009 पासून परागंदा आहे. त्या शिक्षकाला निलंबित करण्यात आले असल्याने त्याची चौकशी सुरू आहे. त्यामुळे तेथे नवीन शिक्षकाची नेमणूक करता येत नाही. येथे शिक्षक नेमणूक करण्याबाबत जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. बी. टी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी, कळवण पंचायत समिती