आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंटेनरच्या धडकेने शालेय विद्यार्थी ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - सायकलवरून शाळेत जाणारा विद्यार्थी कंटेनरच्या जोरदार धडकेने जागीच ठार झाला. बुधवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास बिटको चौकात हा अपघात घडला. अपघातानंतर कंटेनर चालकाने पलायन केले. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओम कचेश्वर पवार (वय 14, रा. गायकवाड मळा, नाशिकरोड) हा शाळकरी विद्यार्थी जेलरोड रस्त्याने बिटको मार्गे सायकलवरून शाळेत जात असताना बिटको चौकात जगदीश रेडिमेड स्टोअर्सनजीक पाठीमागून येणा-या कंटेनरने (जीजे 15 वायवाय 1598) त्याला जोरदार धडक दिली. या अपघातात तो जागीच ठार झाला. वाहतूक पोलिस सातभाई यांनी त्याला बिटको रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्याचे निधन झाले होते. अपघातानंतर कंटेनर सोडून चालकाने पलायन केले.
रस्त्यावर पडलेल्या वह्या-पुस्तकावरील नावावरून ओमची ओळख पटली, तर गणवेशामुळे त्याच्या शाळेचे नाव समजले. ओम हा के. जे. मेहता हायस्कूलमध्ये इयत्ता आठवीत शिकत होता. त्याचे वडील या शाळेतच शिपाई म्हणून नोकरीस असून, त्याच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेने परिसरातील वातावरण शोकाकुल झाले होते.
शिक्षक गहिवरले : या अपघाताचे वृत्त समजताच के. जे. मेहता व पुरुषोत्तम इंग्लिश स्कूलचे शिक्षक बिटको रुग्णालयात दाखल झाले. विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचे समजताच त्यांनाही अश्रू आवरणे कठीण झाले.

अडथळ्यामुळचे अपघात
- बिटको चौकात रिक्षा थांबे, नियम धाब्यावर बसवून घिरट्या घालणा-या रिक्षा, वाहनांच्या पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा झाल्याने शालेय विद्यार्थ्यांचा दुर्देवाने मृत्यू झाला.
आर. डी. धोंगडे, नगरसेवक

पोलिस जबाबदार
अपघातानंतर काही तास पोलिस ताठर भुमिका घेतात नंतर पुन्हा स्थिती जैसे थे होते. पोलिसांनी रिक्षाचालकांवर वचक ठेवल्यास वाहतुक सुरक्षित होऊ शकते मात्र पोलिसांची मानसिकताच नाही.
डॉ. प्रशांत भुतडा, उपाध्यक्ष, व्यापारी बॅँक