आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • School Student Death School Bus Accident At Nashik

गोंडस सारंगचा काळ ठरली स्कूलबस; चालकाला नागरिकांचा चोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिडकोतील उपेंद्रनगर भागात बालवाडीतील विद्यार्थ्याचा मंगळवारी दुपारी स्कूलबसखाली सापडून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरातील रहिवाशांनी संतप्त होऊन बसचालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण होऊन यंत्रणेचा निष्काळजीपणा चव्हाट्यावर आला आहे.

‘मविप्र’च्या उत्तमनगर येथील अभिनव बालविकास शाळेत लहान गटात शिकणार्‍या सारंग राकेश जाधव (वय 4, रा. मोरेमळा) याच्यासह अन्य मुलांना शाळेतून घरी सोडण्यासाठी दुपारी 11.30 वाजता स्कूलबस (एमएच 15, ए.के. 223) गिरणार स्वीट्ससमोर आली. मोरेमळ्याकडे जाणार्‍या रस्त्यावर सारंगची आजी त्याला घ्यायला आली होती. बस थांबताच वाहकाने मुलास पायर्‍यांवरून खाली उतरवत आजीकडे सोपविले. नातवाचे दप्तर हाती घेऊन त्या वाहकाच्या बाजूने मागे जात असतानाच सारंग पुढे पळू लागला. तोच बसचालकाने जागेवरून वळण घेतले व वाहकाच्या बाजूने पळणारा सारंग धक्का लागून चाकाखाली सापडला. त्याच्या पोटावरून चाक जाऊन तो रक्ताच्या थारोळ्यात पडला व गतप्राण झाला. परिसरातील रहिवाशांनी धाव घेत सारंगला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात नेले. दरम्यान, बसचालक सोमनाथ वडजे (रा. सुकेणे, ता. निफाड) यास नागरिकांनीच अंबड पोलिसांच्या स्वाधीन केले. वडजेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सारंग त्याच्या माता-पित्यांचा एकुलता एक मुलगा होता. जाधव कुटुंब मूळचे छाईल (ता. साक्री, जि. धुळे) येथील रहिवासी आहे.

..माझा सारंग वाचला असता
‘गरिबी कोणाच्या वाट्याला येऊ नये. मी कामाला गेले नसते तर माझा एकुलता एक सारंग वाचला असता. आता मी कोणाला सारंग म्हणू,’ असा टाहो सारंगच्या आईने जिल्हा रुग्णालयात फोडला. ते पाहून रुग्णालयातील सर्व उपस्थितांना गलबलून आले.

चालकांना प्रशिक्षण देऊ
असे अपघात यापुढे घडू नयेत, यासाठी चालकांना प्रशिक्षण देण्यात येईल. जाधव कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून, त्यांना आर्थिक मदत करण्यात येईल.
-नीलिमा पवार, सरचिटणीस, मविप्र संस्था