आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकात दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत गोदेचे पाणी, वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक रोड/पुणे/जळगाव/औरंगाबाद - महिनाभराच्या विश्रांतीनंतर राज्यात परतलेल्या पावसाने शुक्रवारी नाशिक जिल्ह्यात जाेरदार हजेरी लावली. याशिवाय नगर, जळगाव आणि पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पावसाचा जोर असून सोलापूर परिसर आणि मराठवाड्यात मात्र शेतकऱ्यांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

काल (शुक्रवारी) हनुमानवाडीतून वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह रामवाडी भागातील नदीकाठी आज सकाळी सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणातून गोदावरी पात्रात 50,000 क्युसेक्स क्षमतेचा विसर्ग करण्यात आला आहे. उद्या (रविवारी) हे पाणी पैठण येथील जायकवाडी धरणात पोहोचेल.

दरम्यान, नाशिकमध्ये  गुरुवारी रात्री ६१ मिमी पाऊस झाला. यामुळे गोदावरीला पूर आला व शहरात पाणीच पाणी झाले. पंचवटी भागात एक मुलगा वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे. नगरमधील भंडारदरा धरण ५४ टक्के भरले आहे. मराठवाड्यात मात्र हिंगोली जिल्हा वगळता इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. 
 
नाशकात रस्त्यांवर पाणीच पाणी
गुरुवारी रात्री बारा वाजल्यापासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाल्यानंतर शुक्रवारी दुपारपर्यंत मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. यादरम्यान ६१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दरम्यान, नाशिक शहरात जागोजागी रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. गोदावरी, नासर्डी, दारणा आणि वालदेवी या नद्या दुथडी वाहत असून यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच या नद्याना पूर आला आहे.
 
नाशिक शहरात गुरुवारी हलक्या सरी कोसळल्या. मात्र मध्यरात्रीपासुन मध्यम स्वरुपाच्या पावसाला सुरुवात झाल्याने शहरातील शरणपुर रोड,सिडको, सातपुर, नाशिकरोड, जेलरोड, उपनगर, देवळाली कँम्प, पाथर्डी फाटा, इंदिरानगर, राणेनगर या परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. त्यामुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना पाण्यातुन मार्ग काढावा लागत होता. तर सराफबाजारात पुन्हा पाणी साचल्याने व्यावसायिकांची त्रेधातिरपीट उडाली होती. त्यामुळे नागरिकांमध्ये महापालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप दिसुन येत होता.
 
मराठवाड्यातील अनेक भागांत अजूनही दुबार पेरणीची भीती
हिंगाेली वगळता अद्यापही उर्वरित मराठवाड्यात पावसाने जाेरदार हजेरी लावली नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली अाहे. मराठवाड्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची नाेंद झाली असली तरी हा पाऊस शेतीसाठी फार दिवस आधार ठरणार नसल्याने दुबार पेरणीची भीती शेतकऱ्यांच्या मनात कायम अाहे. हिंगाेलीत मात्र गुरुवारी चांगला पाऊस झाला होता. शुक्रवारीही या जिल्ह्यात सकाळी ८ वाजेपर्यंत ६६.२५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिवाय दिवसभरात सरासरी १३.२५ मिलिमीटर पाऊस झाला.
 
१९ जुलैपर्यंत मध्यम पावसाचा अंदाज
उत्तर प्रदेशवर निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा आता मध्य प्रदेशकडे सरकला आहे. पश्चिम राजस्थान ते प. बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा असल्याने मध्य महाराष्ट्रासह गुजरातमध्ये पाऊस सक्रिया झाला आहे. त्यामुळे १९ जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
 
मुंबई-पुण्यात जोरदार सरी
मुंबई शहर अाणि उपनगरात पावसाने दमदार हजेरी लावली. मुंबईत गेल्या २४ तासात कुलाबा येथे ३०.८ मि.मी. अाणि सांताक्रुझ येथे २६.३ मि.मी. पावसाची नाेंद झाली अाहे. गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर परिसरातही वरुणराजा दमदार बरसला.
 
पुढील स्लाइडवर... नाशिकमधील मुसळधार पावसाचे फोटो आणि ...मराठवाडा : पावसाची सरासरी अाकडेवारी
 
हे पण वाचा,
बातम्या आणखी आहेत...