आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात ५१ हजार ३७५ शाळा स्वच्छतागृहांविना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधताना केलेली ‘मन की बात’ आणि शासकीय पातळीवर शिक्षण समाजातील सर्व घटकांमधील मुलांपर्यंत पोहोचविण्याच्या विविध योजना यामुळे शाळांमध्ये चांगल्या सुविधा मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, परिस्थिती आणखीनच बिघडलेली असून, महाराष्ट्रात तब्बल ५१ हजार ३७५ शाळांमध्ये प्राथमिक सुविधेचा एक भाग असणारी ८१ हजार ३९७ स्वच्छतागृहे निकामी असल्याचे विदारक सत्य समोर आले आहे. ‘कॅग इंडिया’च्या म्हणजेच कॉम्प्ट्रोलर अ‍ॅण्ड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया (नियंत्रक आणि महालेखापरीक्षक) यांनी महाराष्ट्रातील शाळांबाबत २०१३-१४ या वर्षासाठी दिलेल्या अहवालानुसार अनेक शाळांमध्ये अनेक मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या अहवालामध्ये महाराष्ट्रासह अन्य राज्यांतील ६६ हजार ४४४ सरकारी आणि स्थानिक संस्थांच्या शाळांमध्ये केलेल्या पाहणीतून निष्कर्ष काढण्यात येतात. विद्यार्थ्यांना शाळांमध्ये प्रामुख्याने स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा मिळत नाही. राज्यातील १७ हजार ९७३ शाळांमध्ये मुलांच्या स्वच्छतागृहांत पाणी नाही. तर, १७ हजार ६५५ शाळांत मुलींच्या स्वच्छतागृहांमध्ये पाण्याचा अभाव आहे. फक्त विद्यार्थ्यांसाठीच नव्हे, तर शिक्षकांसाठीदेखी लस्वच्छतागृहांचा अभाव असलेल्या सर्वाधिक शाळा राज्यात आहेत. त्याबराेबरच वाचनालये, वाचनासाठी स्वतंत्र कक्ष किंवा पुस्तकालये नाहीत. पूर्वीपासून अनेक शाळांना भेडसावणारा खेळांच्या मोठ्या प्रमाणावर मैदानांचा प्रश्न अद्यापही कायमच आहे. काही शाळांमध्ये मैदानांच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याने आता मुलांना खेळण्यासाठी, कवायतीसाठी मैदाने राहिलेली नाहीत, अनेक शाळांमध्ये वीजपुरवठा नाही, वर्गांमध्ये फळे नाहीत, शिकविण्यासाठी लागणार्‍या वस्तू जसे नकाशे-तक्ते यांचीही कमतरता आहे, असे निष्कर्ष या अहवालात काढण्यात आले आहेत.

मुलांसाठी स्वच्छतागृहेच नाहीत, काही ठिकाणी ती आहेत. पण, त्यात पाणी नाही, अशी स्थिती सरकारी शाळांमध्ये सर्वाधिक दिसून येते. प्रत्येक शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात यावी, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे असावीत, तेथेही पुरेसे पाणी असावे, दररोज शाळांमध्ये खेळाचे तास व्हावेत, अशा सूचना यापूर्वी सरकारने अनेक योजनांतर्गत दिल्या आहेत. मात्र, या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र या अहवालामुळे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्रातील शाळांची टक्केवारी पाहता, स्वच्छतागृहांत पाणी नसण्याची टक्केवारी सगळ्यात जास्त आहे. मात्र, वीज नसलेल्या शाळांची टक्केवारी कमी असल्याचे दिसून येते.

वाचनालये नाहीत, संगणक आहे, पण वीज नाही
महाराष्ट्रातील २,५२९ शाळांमध्ये वाचनालये नाहीत. तसेच, विद्यार्थ्यांना कॉम्प्युटरचे प्राथमिक शिक्षण मिळावे म्हणून सरकारी योजना तयार करण्यात आल्या होत्या. असे असतानादेखील १८०९ शाळांमध्ये कॉम्प्युटर असूनही वीज नाही. या परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळांमध्ये अतिशय महत्त्वाच्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे.

अशी शाळांची अवस्था
14624 संरक्षण भिंती नाहीत.
51375 स्वच्छतागृहांची सुविधाच नाही.
12183 वीजपुरवठाचनाही.
17655 मुलींच्यास्वच्छतागृहांत पाणी नाही.
14624 खेळण्यासाठी मैदान नाही.
17973 मुलांसाठी स्वच्छतागृहे पाण्याविना.