आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत भंगार बाजार दिवाळीनंतर हटणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- चुंचाळे शिवारातील बहुचर्चित भंगार बाजार हटविण्यासाठी महापालिका आणि पोलिस यंत्रणेने तयारी केली असून, दिवाळीनंतर अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबवून हा बाजार हटविण्यात येणार आहे. यापूर्वी महापालिकेने दोन वेळा तयारी करूनही केवळ कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियोजन न झाल्याने ही मोहीम फत्ते होऊ शकली नाही.

भंगार बाजार हटविण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. यापूर्वी उच्च न्यायालयाने आदेश देऊनही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे भंगार बाजार हटविण्यात आला नाही. त्यामुळे दातीर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. भंगार बाजार हटविण्यात चालढकल करण्यात येत असून, न्यायालयीन आदेशाचा महापालिका अवमान करत असल्याची बाब दातीर यांनी न्यायलयाच्या निदर्शनास आणून दिली. अंतिम निकाल लागत नाही तोपर्यंत भंगार बाजारातील विक्रेत्यांनी मालाची खरेदी करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचनादेखील न्यायालयाने केली होती. मात्र, त्याकडे संबंधित विक्रेत्यांबरोबरच महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन आणि बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष केले गेले.

दिलीप दातीर यांचे निवेदन : हा अनधिकृत भंगार बाजार आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीनेदेखील संवेदनशील बनल्याचे दिलीप दातीर यांनी पालिका आयुक्त संजय खंदारे व पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

रहिवास क्षेत्रावरच बाजार
सध्या अस्तित्वात असलेल्या भंगार बाजाराचे बहुतांश क्षेत्र हे शहर विकास आराखड्यात रहिवास क्षेत्र म्हणून उल्लेखित आहे. असे असताना या क्षेत्राचा व्यावसायिक वापर सुरू असल्याने तसेच त्या ठिकाणीच इतरही बाबींसाठी वापर होत असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. या मुद्यावरून न्यायालयात दावा सुरू आहे.


दिवाळीनंतरच कारवाई
पोलिस आयुक्त व महापालिका आयुक्त हे भंगार बाजार हटविण्यासंदर्भात दिवाळीनंतर बैठक घेऊन निर्णय घेणार आहेत. दिवाळीमुळे पोलिस यंत्रणा व्यस्त असल्याने दिवाळीनंतरच भंगार बाजार हटविला जाण्याची शक्यता आहे.

मोहिमेसाठी बंदोबस्त असा
अतिक्रमण निर्मूलन मोहिमेसाठी चार उपायुक्त, चारशे कर्मचारी, 100 मालट्रक अशी पालिकेची यंत्रणा आहे. किमान दहा दिवसांच्या या मोहिमेसाठी 500 पोलिसांची मागणी पालिकेने केली आहे.