आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Scrap Market Fire Issue At Nashik Public Harassment

बेपर्वाई: नागरिकांना झळ भंगार बाजारातील आगीची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सातपूर-अंबड लिंकरोडवरील भंगार बाजारात अलीकडच्या काळात आग लागण्याच्या तीन घटना घडल्या आहेत. येथे ज्वलनशील वस्तूंचा साठा केला जात असून, रात्रीच्या वेळी थर्माकोल, वायर, टायर व ऑइल यांसारख्या वस्तू येथे सर्रासपणे जाळण्यात येतात.त्यामुळे आजूबाजूच्या नागरी वसाहतींमध्ये उग्र दर्प पसरत असून, आगीच्या घटनांमुळे भंगार बाजार परिसरालगतच्या संजीवनगर, केवल पार्क, विराटनगर या भागातील नागरिकांना भीतीच्या सावटाखाली राहावे लागत आहे. भंगार बाजाराबाबत महापालिका प्रशासनाने त्वरित ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी परिसरातील रहिवाशांनी केली आहे.
भंगार बाजार अनेक वर्षांपासून वादात आहे. प्रशासनाच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे येथील अतिक्रमणासारख्या विषयाकडे सातत्याने दुर्लक्ष होताना दिसत आहे. माजी नगरसेवक दिलीप दातीर व नगरसेवक दिनकर पाटील यांच्या आंदोलनामुळे न्यायालयानेच हे अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, असे असतानाही पोलिस बंदोबस्ताच्या नावाखाली प्रशासनाने वेळकाढूपणाचे धोरण अवलंबवल्याने पुन्हा एकदा भंगार व्यावसायिकांनी अतिक्रमणाबाबत तात्पुरती स्थगिती मिळविली आहे.
नगरसेवक सचिन भोर यांनी गत आठवड्यातच भंगार असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांना सोबत घेऊन दुकानांपुढील भंगार माल दुकानांच्या आत ठेवण्याची मोहीम राबविली होती. मात्र, आजूबाजूला असलेल्या नागरी वसाहतींबाबत कोणत्याही प्रकारचा विचार न करता भंगार व्यावसायिक निष्काळजीपणे व्यवसाय करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यातच आग लागण्यासारख्या घटना नित्याच्याच झाल्याने परिसरातील नागरी वसाहतींतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
ज्वलनशील वस्तूंचा साठा घातक
भंगार व्यावसायिकांकडून ज्वलनशील वस्तूंची साठवणूक केली जात असल्याची बाब धोकादायक आहे. याबाबतच्या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आम्ही वेळोवेळी व्यावसायिकांशी चर्चा केली असून, प्रशासनाकडूनही त्यांना अनेक वेळा नोटिसा देण्यात आलेल्या आहेत. प्रशासनाकडूने लवकरच येथील भंगार बाजार हटविण्यात येणार आहे.
-सचिन भोर, नगरसेवक, प्रभाग 50