आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेमोसमी पावसाचा तडाखा, दिवसभराच्या उकाड्यानंतर सायंकाळी मुसळधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड / नाशिक - शहरासह नाशिकरोड परिसराला बुधवारी सायंकाळी वादळी वारा, विजेच्या कडकडाटासह कोसळलेल्या अवकाळी पावसाने झोडपले. नाशिकरोडला काही ठिकाणी सुमारे दोन तास पाऊस कोसळला. ठिकठिकाणी वीज यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे पुरवठा खंडित झाला.
बुधवारी कमाल तपमान 40 अंशांपर्यंत गेल्याने उकाडा कमालीचा वाढला होता. किमान 22.2 अंश सेल्सिअसची नोंद झाली. दोन दिवसांपासून शहरातील तपमान 38 ते 40 अंशांदरम्यान होते. सायंकाळी साडेसहापासून सोसाट्याच्या वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. पेठरोड, उपनगर, पंचवटी, तिडके कॉलनी, सिडको, सातपूर, द्वारका, विजयनगर, उत्तमनगर, महाराणा प्रताप चौक, पाथर्डी फाटा या भागात बेमोसमी पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली.
दुपारनंतर शहरात पावसाचे वातावरण तयार झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने जनजीवन विस्कळित झाले. झोपडपट्टीवासीयांची धावपळ उडाली. पावसामुळे रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहत होते. प्रवाशांचेही हाल झाले. बस-रिक्षा थांब्यांवर पावसातच प्रवाशांना वाहनांची वाट पाहावी लागली. खासगी वाहतूकदारांनी भाडे वाढवून या संधीचा फायदा घेतला.
अनेक मंगल कार्यालयांतील हळदी समारंभावरही परिणाम झाला. देवळाली कॅम्पला दमदार पावसाने हजेरी लावली. चेहडी, शिंदे, पळसे येथे पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.
स्थानिक परिणाम
सध्या उकाड्यात अधिक वाढ झाल्याने आद्र्रतेवर परिणाम होऊन बेमोसमी पाऊस पडत आहे. मात्र, हा केवळ स्थानिक परिणाम आहे. व्ही. के. राजू, हवामानतज्ज्ञ
व्याख्यानमाला रद्द
देवळाली व्यापारी बँकेच्या वसंत व्याख्यानमालेच्या वेळेसच मुसळधार पावसाला सुरुवात झाल्याने डॉ. विभावरी वराडे यांचे व्याख्यान रद्द करण्यात आले तर दुर्गामाता देवस्थानच्या व्याख्यानमालेतील रामदास फुटाणे यांच्या व्याख्यानाला उशिरा सुरुवात झाली.
नाशिकरोड आणि नाशिक परिसरात संध्याकाळच्या सुमारास विजांसह जोरदार पाऊस झाल्यानंतर रस्तोरस्ती असे दृश्य दिसत होते.