आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच नाशकात पोलिसावर हल्ला, प्रकृती गंभीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशार देत मुंबईकडे प्रयाण करणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पाठ फिरताच आणखी एका पोलिस कर्मचाऱ्यावर नाशकात प्राणघातक हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. ८) रात्री वाजता भद्रकाली परिसरातील ठाकरे गल्ली येथे घडला. या कर्मचाऱ्यावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, प्रकृती चिंताजनक अाहे. शहरात गेल्या दोन दिवसांत पोलिसांवरील हा चौथा हल्ला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भद्रकाली पोलिस ठाण्याचे बीटमार्शल पोलिस हवालदार विजय मोरे (बक्कल नंबर ८१) हे भद्रकाली पोलिस ठाण्यात गस्तीवर असताना ठाकरे गल्ली येथे दोन गटांत हाणामारी सुरू असल्याची माहिती बिनतारी संदेश यंत्रणेवर मोरे यांना प्राप्त झाली. तत्काळ मोरे घटनास्थळावर पोहोचले. दोन्ही गटांमधील वाद सोडवत असताना संशयितांनी मोरे यांनाच लक्ष्य करत बेदम मारहाण केली. डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मोरे यांना परिसरातील नागरिकांनी तत्काळ नजीकच्या दवाखान्यात दाखल केले. गंभीर जखम आणि रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांना मुंबई नाका येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, वरिष्ठ निरीक्षक सोमनाथ तांबे यांनी मोरे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. एक पथक संशयिताच्या मागावर पाठवण्यात आले आहे. दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी हल्ल्याची गंभीर दखल घेत संशयितांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिकाऱ्यांना दिले.
कठोर कारवाई करणार
पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला ही गंभीर बाब आहे. संशयित लवकरच पकडले जातील. संशयितांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस कर्मचाऱ्यांवर यापुढे कोणी हल्ला करणार नाही, अशी कडक कारवाई केली जाईल. हल्ला होणे हा गंभीर प्रकार आहे. -डॉ. रवींद्रकुमार सिंघल, पोलिस आयुक्त

बातम्या आणखी आहेत...