आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

त्र्यंबकेश्वरला दुसऱ्या दिवशीही गोंधळ, गर्भगृहात प्रवेश करण्यासाठी महिलांचा आक्रमक पवित्रा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
त्र्यंबकेश्वर - त्र्यंबकेश्वरच्या मंदिर गर्भगृहात गुरुवारी लघुरुद्र सुरू असल्याने तेथे पाय ठेवण्यासही जागा नव्हती. त्यामुळे स्वराज्य महिला संघटनेला गर्भगृहात प्रवेश मिळू शकला नाही. मात्र त्यामुळे संतप्त झालेल्या संघटनेच्या महिलांनी अर्वाच्य भाषा वापरत ‘आम्हाला मुद्दाम गर्भगृहात जाऊ दिले जात नाही’, असा पवित्रा घेतल्याने गोंधळ उडाला. गर्भगृहात जाण्यासाठी काही नियम असल्याचे या महिलांना सांगण्यात आले, परंतु त्या काहीही एेकण्यास तयार नव्हत्या. त्यामुळे स्थानिक भक्तांनीही जर त्यांना गर्भगृहात प्रवेश दिला तर आम्हीही पँट-शर्ट अथवा अंगावर जे कपडे असतील तसा प्रवेश करण्याची धमकी दिली.
या गाेंधळानंतर संघटनेच्या काही महिलांनी गर्भगृहाजवळ, तर काहींनी दक्षिण दरवाजाजवळच ठाण मांडले. अखेर सकाळी सात वाजता देवस्थानाची पूजा सुरू झाल्यानंतर सर्वांना बाहेर काढण्यात आले. या प्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी देण्यात आल्या असून, संघटनेने प्रवेश मिळेपर्यंत आंदोलनाचा निर्धार करत रात्री उशिरापर्यंत मंदिर परिसरातच तळ ठोकला आहे.

बुधवारी रात्री नऊपर्यंत या महिलांनी मंदिराच्या प्रांगणात तळ ठोकला होता. देवस्थानाच्या नियमाप्रमाणे सकाळी सहा ते सात या कालावधीतच पुरुषांना सोवळे व ओल्या सुती वस्त्राने गर्भगृहात पूजेस प्रवेश मिळतो ही माहिती मिळाल्यानंतर या महिलांनी अखेर मंदिर बंद होण्याची वेळ झाल्यानंतर मंदिराचा परिसर सोडला. काही वेळाने पुन्हा त्या मंदिराच्या परिसरात दाखल झाल्या. गुरुवारी सकाळी सहालाच संघटनेच्या अध्यक्षा वनिता गुट्टे यांच्यासह कार्यकर्त्यांनी दक्षिण दरवाजातून पोलिस संरक्षणात मंदिरात प्रवेश केला. परंतु, गर्दीमुळे त्यांना गर्भगृहात प्रवेश करता आला नाही. गर्भगृहात प्रवेशासाठी अंगावर सुती कपडे आवश्यक असल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी ‘आमच्या अंगावर सुती कपडेच अाहेत’ असे सांगितले. यावर स्थानिकांनी आक्षेप घेत आम्हीही अंगावर जे कपडे असतील तसा प्रवेश करण्याची धमकी दिली. देवस्थानचे कर्मचारी, विश्वस्तांनी महिलांना समजाविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्या काहीही ऐकण्यास तयार नव्हत्या. पाेलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्या महिलांना पोलिस ठाण्यात तक्रार देण्याबाबत सुचविले. परंतु, महिला काहीही ऐकण्याच्या स्थितीत नव्हत्या. अखेर सकाळी नऊ वाजता त्या पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. मंदिरात जाण्यापासून अडविल्याबद्दल वनिता गुट्टे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याेगेश तुंगार, धनंजय तुंगार, समीर वैद्य, अमित टोकेकर आदींविरोधात फिर्याद दिली. तसेच, देवस्थानचे कर्मचारी व तुंगार यांच्यासह इतरांनी या महिलांविरोधात पोलिसांत तक्रार दिली.