आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनडीएसटी’च्या सर्वसाधारण सभेत गुरुजींची यंदाही हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - देशाचे भावी नागरिक घडविणारे तसेच विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या काही गुरुजनांनी नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रविवारी गोंधळ घालून हाणामारी केल्याचे दृश्य दिसले. या सभेमध्ये काही शिक्षकांनी आपल्यातील गुंडप्रवृत्तीचे प्रदर्शन करून शिक्षकी पेशाला बदनाम करण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली. याच गोंधळाच्या वातावरणातच १३ विषय मंजूर करण्यात आले. त्यामुळे विरोधकांनी प्रतिसभा घेत आम्हाला ठराव मंजूर नसल्याचे सांगितले.

नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स को. ऑप. क्रेडिट सोसायटीची या पंचवार्षिकमधील पहिलीच वार्षिक सर्वसाधारण सभा नूतन अध्यक्ष राजेंद्र निकम यांच्या अध्यक्षतेखाली परशुराम साईखेडकर सभागृहात झाली. टीडीएफ या शिक्षक संघटनेने बाजी मारीत सोसायटीवर आपली सत्ता काबीज केली. परंतु, सर्वसाधारण सभेत घेतले जाणारे ठराव सभासदांना मान्य नसल्याने सुरुवातीपासून मंचावर गोंधळ सुरू होता. इतिवृत्त वाचून झाल्यावर सभासदांना बोलण्याची संधी देण्यात आली. या वेळी ज्यांना ठराव मंजूर नाही, त्यांनी स्पष्टपणे सांगितल्याने अध्यक्षांच्या समर्थकांनी विरोध करीत, वेळ मारून नेण्याचे प्रकार सुरू केले. विरोधी गटाच्या सभासदांनीही गोंधळास सुरुवात केली. एकमेकांना कारे-आरे करणे, माईक हिसकावून घेणे, एकमेकांवर धावून जात मारामारीसारखे प्रकार घडले.
याच गोंधळामध्ये सर्वसाधारण सभेपुढील मांडण्यात आलेले सर्व विषय मंजूर झाल्याचे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर काही विरोधी संचालकांनी दहा विषय सोसायटीच्या बैठकीत आले नसल्याने या बाबीचा निषेध करत आठ संचालकांनी सभासदांमध्ये जाऊन बसण्यास पसंती दिली. तर विरोधकांनी आम्हाला मांडण्यात आलेला एकही ठराव मंजूर नसल्याचे सांगत प्रतिसभा घेऊन निषेध केला. अध्यक्षांच्या मनोगतापासूनच विरोधकांनी गोंधळास सुरुवात करीत मंचावर गर्दी केली. यात तीन माईकचे नुकसान झाले. वीजपुरवठा खंडित झाल्याने सभासदांनी आरडाओरड करून हे मॅनेज असल्याच्या घोषणा दिल्या.

या वेळी अध्यक्ष राजेंद्र निकम, उपाध्यक्ष विजया पाटील, मोहन चकोर, भाऊसाहेब पाटील, भाऊसाहेब शिरसाट, बाळासाहेब ढोबळे, रामराव बनकर, संजय देवरे, जिभाऊ शिंदे, अरुण पवार, संजय चव्हाण, राजेंद्र सावंत, हेमंत देशमुख, दत्तात्रय आदिक, भीमराज काळे, संजय देसले, कारभारी गांगुर्डे, भारती पवार आदींसह सोसायटीचे सभासद उपस्थित होते.

संचालकांवर कायद्यानुसार कारवाई करणार
जे विद्यमान संचालक नियम डावलून रविवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी सभासदांमध्ये जाऊन बसले, त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी जिल्हा निबंधकांकडे तक्रार करणार आहे. राजेंद्र निकम, अध्यक्ष, ‘एनडीएसटी’

सत्ताधाऱ्यांनीच घातला वार्षिक सभेत गोंधळ
सोसायटीच्यावार्षिक सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांनी मुद्दाम गोंधळ घातला असून, त्या गोंधळामध्येच त्यांना विषय मंजूर करायचे होते. तसेच, वीजपुरवठा खंडित करण्यातही त्यांचाच हात आहे. पुरुषोत्तमर किबे, सभासद

संचालकपदापेक्षा सभासदांचे हित महत्त्वाचे
आम्हालासंचालकपदापेक्षा सभासदांचे हित महत्त्वाचे आहे. त्यामुळे आम्हाला ठराव मंजूर नाही. तसेच, बैठकीमध्ये आम्हाला डावलण्यात आले आहे. त्यामुळे अध्यक्षांना कारवाई करण्याचा अधिकार आहे, त्यांनी नक्कीच कारवाई करावी. संजय चव्हाण, संचालक
सभेत हे ठराव मंजूर
>सोसायटीच्या सभासदांना टक्के लाभांश देणार
>२०१५-१६ च्या अंतर्गत आणि वैधानिक हिशेब तपासणीस नेमणूक करणे
>पोटनियम दुरुस्तीस मान्यता देणे
>मालेगाव शाखेला उपविभागीय दर्जा देऊन तेथील फ्लॅट विक्री नवीन जागा खरेदी करणे, इमारत बांधण्यास मंजुरी देणे.
>मागील संचालकांच्या कर्जाची वसुली करणे
छायाचित्र: नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स क्रेडिट सोसायटीच्या वार्षिक सभेत उपस्थित काही शिक्षक सभासदांनी गोंधळ घालत हाणामारी केली.