नाशिक - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या आपत्तीसाठी प्रशिक्षित रक्षकांची तुकडी तयार असून, जिल्हाधिकारी सांगतील तेथे कुमक तैनात करण्यात येईल, अशी ग्वाही नागरी संरक्षण दलाचे उपनियंत्रक किसन सांगळे यांनी दिली.
आजमितीस नागरी संरक्षण दलाकडे 5,538 प्रशिक्षित रक्षक आहेत. सिंहस्थापर्यंत आणखी 2 ते 3 हजार रक्षक तयार करण्यात येतील. दर महिन्याला दलातर्फे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे काम सुरू असते. साधारणत: 2 ते 3 वर्ग घेण्यात येतात. त्याद्वारे एका वर्गात सुमारे 125 प्रशिक्षक भाग घेतात. अशा पद्धतीने वर्षाला 500 ते 600 प्रशिक्षित रक्षक तयार होत आहेत.
सदरच्या रक्षकांना जेथे-जेथे आपत्ती प्रसंग ओढवतो, तेथे त्वरित संबंधित रक्षक मदतीसाठी पाठविले जातात. सदरच्या रक्षकांना प्रथमोपचार, विमोचन, पूरविमोचन अग्निशमन यांचे प्रशिक्षण दिले जाते.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सातत्याने जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली बैठका होत असून, त्यात नागरी संरक्षण दलाचे योगदान निश्चित असणार आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचेही सांगळे म्हणाले.