आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा: दोन महिन्यांत निविदा; वर्षभरात 630 कॅमेरे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- कुंभमेळ्यात देशभरातून येणार्‍या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी शहरात 172 ठिकाणी 630 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. या कामाची निविदा प्रक्रिया दोन महिन्यात पूर्ण होणार असून, साधारणत: मार्च 2015 पर्यंत नियोजित स्थळी कॅमेरे लागणार आहेत. सर्वाधिक 41 कॅमेरे रामकुंड, शाही मार्गावरील प्रमुख चौक, गंगाघाट येथे बसवण्यात येणार आहेत.
पर्वण्यांसाठी येणार्‍या कोट्यवधी भाविकांची सुरक्षितता व गर्दीचे नियोजन करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर राहणार आहे. अतिरेकी हल्ल्याचा संभाव्य धोका लक्षात घेता गर्दीची ठिकाणे, बसस्थानकांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. पोलिस आयुक्त कार्यालयाकडून दोनशेहून अधिक ठिकाणांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला. गृहसचिवांनी त्याचा आढावा घेत त्यास तत्त्वत: मंजुरी दिली. त्यानंतर मुंबईहून आलेल्या प्रतिनिधी मंडळाने शहरात पाहणी करून 172 ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी सुमारे 630 कॅमेरे बसवण्याचा नवा प्रस्ताव सादर केला. त्यास शासन स्तरावरून मंजुरी मिळाली असून, येत्या अधिवेशनात त्यासाठी 60 ते 70 कोटी रुपयांचा निधी प्राप्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, कॅमेरे बसवण्यासाठी दोन महिन्यांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन त्यानंतर वर्षभरात तेथे कॅमेरे बसवले जाणार असल्याचे अधिकृत पोलिस सूत्रांनी सांगितले.