आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बसस्थानकांची सुरक्षा रामभरोसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिवाळीत राज्यामध्ये दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता वर्तविली असतानाही शहरातील बसस्थानके मात्र ‘रामभरोसे’ असल्याचे चित्र शनिवारी ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीत आढळून आले.

ठक्कर बाजार हे शहरातील मुख्य बसस्थानक आहे. येथे महिलांच्या मदतीसाठी ‘विशेष पोलिस चौकी’ उभारण्यात आली आहे. मात्र, या चौकीत एकही पोलिस कर्मचारी नसल्याचे शनिवारी करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आले. बेवारस स्थितीत पडलेल्या बॅगा, अस्ताव्यस्त पडलेले सामान असे चित्र येथे दिसून आले. या चौकीजवळच शेजारच्या खासगी बसचालक प्रवाशांना पुण्याला येणार का, औरंगाबादला जायचे का, असे विचारताना दिसून येत होते.

एकंदरीतच ऐन सणासुदीतसुद्धा येथे आवश्यक असलेल्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत ना पोलिसांना गांभीर्य दिसून आले, ना महामंडळाला. ‘आओ जाओ घर तुम्हारा’ अशीच स्थिती येथे दिसून आली. सुरक्षाव्यवस्थेतील अशा बेपर्वाईमुळे बसस्थानकात यापूर्वी अनेकदा चोरीच्या, प्रवाशांना मारहाणीच्या घटना घडलेल्या आहेत. सोनसाखळी चोरीचे प्रकारही येथे वरचे वर होत आहेत. ‘पोलिस चौकी आहे, पण पोलिसच गायब’ यामुळे भुरट्या चोरांचे, पाकिटमारांचे चांगलेच फावते. कोणीही सहजपणे येऊन कुठलीही वस्तू ठेवून निघून जाऊ शकतो. बंदोबस्तावर असलेले पोलिस कर्मचारीदेखील स्थानकावर पाहणी, तपासणी करताना कधीही दिसून येत नाहीत. त्यामुळे बसस्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठक्कर बाजार बसस्थानक परिसरातील हा लाइव्ह रिपोर्ट..

दुपारी 1 वा.- सणासुदीच्या दिवसांत राज्यात दहशतवादी कारवाई होण्याचा इशारा प्रशासनाला मिळूनदेखील शहरातील ठक्कर बाजार बस्थानकात योग्य ती खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळून आले आहे. शनिवारी दुपारी 1 वाजता ‘दिव्य मराठी’च्या चमूने पाहणी केली. या वेळी अनेक प्रवासी मोठय़ा सामानासह बसस्थानकातून ये-जा करत होते. मात्र, एकाही संशयिताची कुठलीही तपासणी केली जात नव्हती. विशेष म्हणजे महिला सहाय्यता केंद्रात एकही पोलिस कर्मचारी हजर नव्हता. काही ठिकाणी बेवारस वस्तूही पडलेल्या होत्या. त्याकडेही कुणाचे लक्ष नव्हते.


महामंडळातर्फे दर तासाला बेवारस वस्तूंना हात लावू नये, पाकिटमार व चोरांपासून सावध राहावे, अशी टेप वाजवली जात होती. मात्र, केवळ टेप वाजवून आपली जबाबदारी संपते, याचा जणू महामंडळ प्रशासनाला विसर पडला असावा, अशी परिस्थिती होती. निदान सणासुदीच्या काळात तरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सुरक्षेचे उपाय वाढविणे गरजेचे आहे, अशी बोलकी प्रतिक्रिया प्रवाशांनी ‘दिव्य मराठी’च्या चमूकडे व्यक्त केली.

दुपारी 1.30 वा.- दुपारी दीड वाजेच्या सुमारास एक पोलिस निरीक्षक आपल्या वर्दीचा धाक दाखवून तिकीट खिडकीतून तिकीट घेताना दिसून आले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा गायब झाले. दोनच्या सुमारास खासगी बस कंपन्यांचे एजंट या ठिकाणी आले. ‘पुण्याला येणार का’, ‘औरंगाबादला जायचे का’, अशाप्रकारे विचारणा करीत ते प्रवाशांना त्रास देत होते. तब्बल दोन तासांच्या या पाहणीत ठक्कर बाजार बसस्थानकात एकही महिला किंवा पुरुष पोलिस कर्मचारी दिसून आला नाही, हे विशेष.


महिला केंद्रात पोलिस गरजेचे
निदान दिवाळी कालावधीत तरी सुरक्षेच्या उपाययोजना वाढविणे गरजेचे आहे. सोनसाखळी चोरीच्या वाढत्या घटना पाहता येथील महिला केंद्रात महिला पोलिसांनी थांबले पाहिजे. साधना मोरे, प्रवासी

तपासणीसाठी यंत्र बसवावे
मुंबई व पुण्या- नंतर आता नाशिकही ट्रेड सिटी झाले आहे. रोज हजारो प्रवासी बसस्थानकांवरून ये-जा करीत असतात. या ठिकाणी वस्तूंची तपासणी होण्यासाठी यंत्राची व्यवस्था होणे गरजेचे आहे. योगेश चव्हाण, प्रवासी