आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वाइन फ्लूच्या मुद्यावरून पालिका प्रशासनाला घेरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरात स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झाल्यानंतर महापालिका प्रशासन आरोग्याच्या दृष्टीने ढिम्मच असल्याचे बघून आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत या मुद्यावरून आरोग्य विभागाला घेरण्यासाठी महासभेत लक्षवेधीद्वारे चर्चा घडविण्याची मागणी केली आहे.
उन्हाळ्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असताना धूर औषध फवारणी बंद झाल्यावरूनही प्रशासनाला कोंडीत पकडले जाणार आहे. दुसरीकडे महापालिकेच्या रुग्णालयांतही रुग्णांची हेळसांड करण्याचे प्रकार घडत असल्यामुळे त्याचाही जाब विचारला जाणार आहे.

शहरात स्वाइन फ्लूमुळे दोघांचा मृत्यू झाला असून, एका बालकालाही स्वाइन फ्लूसदृश आजाराने मृत्यू झाला आहे. मध्यंतरी महापौर अशोक मुर्तडक यांनी वैद्यकीय विभागाची झाडाझडती घेत रोज स्वाइन फ्लूचा अहवाल तयार करावा खासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याचे आदेश दिले होते. याबरोबरच स्लम परिसरात तपासणीचेही आदेश दिले होते. प्रत्यक्षात किती रुग्णांची तपासणी झाली याचा अहवाल वैद्यकीय विभागाकडेच नाही.
या विभागाने केवळ खासगी रुग्णालयांकडील रुग्णांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. दरम्यान, स्वाइन फ्लूचा उद्रेक वाढत असताना शहरातील आरोग्य वा अस्वच्छतेसंदर्भात पालिकेने पावले उचललेली नाहीत. पेस्ट कंट्रोलच्या ठेक्यासाठी नवीन निविदा निघालेली नाही विद्यमान ठेकेदाराला मुदतवाढ देण्यासंदर्भातचे घोंगडे काम कोणामार्फत करून घ्यायचे, या मुद्यावरून भिजत पडले आहे. अशा स्थितीत शहरातील आरोग्य धोक्यात आले, तर कोणाला जबाबदार धरणार, असा सवाल थेट आयुक्त गेडाम यांनाच विचारण्याचा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.
रुग्ण आले, तर उघडू कक्ष...

डॉ.जाकीर हुसेन रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्ष बंद असल्याबाबत विचारले असता आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी रुग्ण आले, तरच कक्ष उघडता येईल, असे अजब उत्तर दिले. हा कक्ष ऑयसोलेटेड असल्यामुळे उघडा ठेवता येत नाही, असेही त्यांनी सांगितले. अपुऱ्या मनुष्यबळाबाबत विचारल्यावर मात्र त्यांनी माहिती कोणाकडून घेतली, असा प्रतिप्रश्न करीत वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांच्याशी संपर्क करा, असे सांगितले.

चार रुग्ण दाखल

स्वाइन फ्लूची लागण झालेले आणखी चार रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील दोन रुग्ण जिल्हा रुग्णालयातील स्वाइन फ्लू कक्षात, तर दोन रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील एक रुग्ण सिन्नर येथील वावीचा असून, दुसऱ्या रुग्णाचा पत्ता मात्र समजू शकलेला नाही. खासगी रुग्णालयांतील दोन महिलांपैकी एक काठे गल्ली येथील, तर दुसरी सावतानगर परिसरातील रहिवासी आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांतही १० रुग्णांवर स्वाइन फ्लूचे उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाच्या औषध भांडार विभागाने सांगितले.
जानेवारीपासून आतापर्यंत स्वाइन फ्लूचे २७ संशयित रुग्ण सापडल्याचे महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे म्हणणे असून, त्यात १९ रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यातील बहुतांश रुग्ण हे खासगी रुग्णालयांतीलच आहेत.

लोकांच्या जिवाचीच परीक्षा

^डेंग्यूमुळे अनेकांचा बळी गेल्याचे ताजे उदाहरण असताना डासांचे प्रमाण वाढूनही फवारणी मात्र बंदच आहे. शहरभर अस्वच्छता पसरली आहे. हा लोकांच्या जिवाचीच परीक्षा असून, शिवसेना लक्षवेधीद्वारे बेजबाबदार अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहे. अजय बोरस्ते, गटनेता तथा महानगरप्रमुख, शिवसेना