आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Senior Author Bhalchandra Nemade Comment On Traditional

'संस्कारहीन परंपरांमुळे समाजाची दिशाभूल’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘परंपरेपेक्षा कुठलाही माणूस श्रेष्ठ नसतो. मात्र आंधळ्यासारखे परंपरांचे अर्थ न लावता त्यात नेहमीच समृद्धता आणत राहणे, नवनवीन धुमारे त्या परंपरेत निर्माण करणे हे लेखकाबरोबरच समाजाचे काम आहे. मात्र मूल्यसंस्कार न उरलेल्या समाजाला परंपरांचा अर्थ नीट न लावता आल्याने तरुण पिढीची अवस्था कृष्णविवरात अडकल्यासारखी झाली आहे.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी केले.

शंकराचार्य संकुलात ज्योती स्टोअर्स व नवनीत पब्लिकेशनतर्फे आयोजित ‘लेखक तुमच्या भेटीला’ कार्यक्रमात ते ‘कोसला ते हिंदू : साहित्यिक प्रवास’ या विषयावर बोलत होते.

पांडुरंग सांगवीकर यालाही या साच्याच्या पलीकडे नेण्याचा माझा प्रयत्न होता असे सांगत अनेक समीक्षक-वाचकांनी कोसलातील अनेक प्रसंगांचा अन्वयार्थ चुकीचा लावल्याने आता मला स्वत:लाच ती कादंबरी वाचणे दु:खदायक वाटते, अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली. आपल्या देशाला लाभलेल्या धार्मिक परंपरेचा मी भोक्ता आहे व या परंपरेवरच आपला देश टिकून आहे यावर माझा विश्वास असल्याचे नेमाडे यांनी नमूद केले. कोसलानंतर तब्बल अकरा वर्षांनी बिढार, जरीला, झूल लिहिताना वैविध्य जपण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी सांगितले.

अभिनेते व कवी किशोर कदम यांनी ‘कोसला’ या कादंबरीतील काही भागांचे नाट्यपूर्ण वाचन केले. यावेळी व्यासपीठावर पॉप्युलर प्रकाशनाचे प्रकाशक रामदास भटकळ, संजय परांजपे, जयंत खैरनार आदी उपस्थित होते. यावेळी बापूराव देसाई यांचा त्यांच्या साहित्यकृतीबद्धल शासनाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. पॉप्युलरच्या अस्मिता मोहिते, प्राचार्य दिलीप धोंडगे, राजाभाऊ मोगल, माजी आमदार निशिगंधा मोगल, कवी प्रकाश होळकर आदी यावेळी उपस्थित होते.

‘कोसला’ची सुवर्णमहोत्सवी आवृत्ती
यावेळी नेमाडे यांच्या ‘कोसला’ या कादंबरीच्या सुवर्णमहोत्सवी आवृत्तीची प्रकाशनपूर्व डमी आवृत्ती दाखविण्यात आली. दसर्‍याच्या दिवशी या आवृत्तीचे पॉप्युलरतर्फे प्रकाशन करण्यात येणार असल्याचे वसंत खैरनार यांनी प्रास्ताविकात जाहीर केले. 1963 साली लिहिलेल्या या कादंबरीमध्ये नव्या आवृत्तीत नेमाडे यांचे संग्रहित छायाचित्रे तसेच कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांची छायाचित्रे व काही नवीन संदर्भांचाही समावेश असणार आहे.