आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकरांचे दीर्घाजाराने निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या अर्ध्या शतकापासून अभ्यासपूर्ण वैचारिक लिखाणातून महाराष्ट्राचे प्रबोधन करणारे ज्येष्ठ विचारवंत वसंत पळशीकर (वय ८०) यांचे दीर्घ आजाराने शनिवारी सकाळी नाशिकमध्ये निधन झाले. कोणत्याही विचारसरणीच्या छावणीत अडकता, वास्तविक अनुभवांशी पडताळून पाहण्याची दृष्टी महाराष्ट्रातील जनतेला देणारा शेवटचा दुवा पळशीकर यांच्या निधनाने निखळला. संवादी भूमिकेमुळे राज्याच्या समाजपरिवर्तन प्रक्रियेतील अनेक चळवळी आणि कार्यकर्त्यांचे ते मार्गदर्शक होते. स्नेहपूर्ण चिकित्सा आणि संवादी मांडणी हे त्यांच्या कामाचे वेगळेपण होते. त्यामुळे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत समाजपरिवर्तनाच्या अनेक चळवळींमध्ये त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. उर्वरित.पान

गेल्याबारा वर्षांपासून ते नाशिकमध्ये त्यांचे पुत्र माधव यांच्याकडे वास्तव्यास होते. पक्षाघाताच्या आजारानंतर त्यांचे निधन झाले. विचारांची चिकित्सा आणि नावीन्याचा शोध याच उद्देशाने स्थापन झालेल्या समाजप्रबोधन पत्रिका आणि नवभारत या वैचारिक नियतकालिकांचे त्यांनी दीर्घकाळ संपादक हाेते. सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण, जमातवाद, धर्म, धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धा, चौकटीबाहेरचे चिंतन ही त्यांची ग्रंथसंपदा प्रकाशित झाली आहे. बी. आर. नंदा लिखित गोपाळकृष्ण गोखले यांचे चरित्र आणि थिओडोर शुल्ट्झ यांच्या ‘पारंपरिक आणि आधुनिक शेती’ या पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केला. विवेकवाद, विज्ञान आणि अंधश्रद्धा या मे. पु. रेगे यांच्या पुस्तकाचे तसेच ‘सोवियत रशियाची पन्नास वर्षे’ या दोन खंडांचे संपादन त्यांनी केले.

पळशीकर यांचा जन्म हैदराबादला झाला. किशोरवयातच त्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीत स्वत:ला झोकून दिले. भूदान चळवळ, सेवाग्राम आणि आनंदवन या ठिकाणी त्यांचा सामाजिक कार्यात सहभाग होता. ओरिसातील पोरापूट येथील सर्व सेवा संघाच्या सामाजिक कामात त्यांचे महत्त्वाचे योगदान राहिले. कार्यकर्ता ते विचारवंत या प्रवासात ते अनेकांचे वैचारिक मार्गदर्शक राहिले. वर्धा येथे २००२ मध्ये झालेल्या ‘जागतिकीकरण’विषयक विचार वेध संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्रातील प्रयोगशील शिक्षणाच्या चळवळीचे ते प्रमुख मार्गदर्शक होते.
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने २०१२ मध्ये जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित केले. त्याआधी १९९७ मध्ये महाराष्ट्र फाउंडेशनचा जीवनगौरव त्यांना प्रदान करण्यात आला होता. औरंगाबादचा अनंत भालेराव पत्रकारिता पुरस्कार आणि कोल्हापूरच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा राजर्षी शाहू पुरस्कार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता.
बातम्या आणखी आहेत...