नाशिक - दमणगंगाआणि गोदावरी नदीजोड प्रकल्पाचे हक्काचे पाणी हे महाराष्ट्रालाच मिळेल, त्यासाठी वरिष्ठ अधिका-यांचा स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आणि जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांना मंगळवारी दिले.
खासदार हेमंत गोडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना दमणगंगा गोदावरी लिंक हा इंटर स्टेट लिंक प्रकल्प आहे. त्यामुळे १४ फेब्रुवारी १९९७ च्या कराराप्रमाणे प्रत्येक राज्याचे पाणलोट क्षेत्रातील पाणी संबंधित राज्यालाच मिळावे आणि त्या राज्याच्या खो-यात पडावे, हे राष्ट्रीय प्रकल्पाचे उद्दिष्ट असावे असे पत्र दिले होते. त्याबाबत दादा भुसे, हेमंत गोडसे आणि राजेंद्र जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना याविषयी माहिती सांगितली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी यासाठी खासदार, आमदार यांची लवकरच बैठक आयोजित करून एक महिन्यात या प्रकल्पासाठी वरिष्ठ अधिकारी असलेली स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात येईल, असे आश्वासन दिले.