आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदोबस्तावरील पोलिसांना मिळणार मोफत भोजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहरातील आदर्श मराठा प्रतिष्ठानकडून गणेश विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिसांना मोफत भोजन पिण्याचे पाणी पुरवण्यात येणार आहे. सार्वजनिक उत्सवात दुर्लक्षित असणाऱ्या पोलिस या घटकासाठी मदत पुरवण्याच्या उद्देशातून प्रतिष्ठानने यंदा प्रथमच हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती प्रमोद काळभोर महेश दांगट यांनी दिली.

यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, प्रतिष्ठानचे शंभरपेक्षा अधिक सक्रिय सभासद आहेत. या सभासदांकडून दरमहा शंभर रुपये वर्गणी जमा करण्यात येते. समाज सार्वजनिक उत्सव शांततेत पार पाडतो, यामागे पोलिसांची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मात्र, समाजाचा पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन मित्रत्वाचा नसतो. यातून पोलिसांच्या कामाची योग्य ती दखल घेतली जात नाही. पोलिसांशी संवाद साधला असता पुणे, मुंबई येथे काही सामाजिक संस्थांकडून विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तावरील पोलिसांना जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. नगरमध्ये अशी काही व्यवस्था नसल्याची खंतही त्यांच्या बोलण्यातून जाणवली. त्यातूनच प्रतिष्ठानच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना मोफत भोजन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

या उपक्रमासाठी सभासदांनी स्वयंस्फूर्तीने देणगी दिली असून यातून २७ सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांना प्रतिष्ठानकडून मोफत भोजन पिण्याच्या पाण्याची बाटली पुरवण्यात येणार आहे. जवळपास १००० भोजनाचे पॅकेटस् पाण्याच्या बाटल्या यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. पोलिस अधिकारी अशोक ढेकणे अविनाश मोरे यांच्याशी संपर्क करून उपक्रमाबाबत माहिती दिली असून त्यांनी उपक्रमाला परवानगी दिली आहे. बंदोबस्तांवरील पोलिसांची संख्या, बंदोबस्ताचे ठिकाण यांची माहिती अधिकाऱ्यांकडून प्रतिष्ठानला देण्यात येणार आहे. त्या माहितीनुसार प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रतिष्ठानचे सदस्य पोलिसांना सुविधा पुरवणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे सचिन तुंगार, संदीप जाधव, महेश यादव, सौरभ वाघ, दत्ता झिंजुर्डे यांनी दिली. २७ सप्टेंबरला प्रतिष्ठानचे सदस्य दुपारी दोन वाजता विशाल गणपती मंदिर येथे जमणार आहेत. या ठिकाणी आरती केल्यानंतर चौपाटी कारंजा येथेही आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर उपक्रमाला सुरुवात होणार असल्याचे प्रतिष्ठानकडून कळवण्यात आले आहे. प्रतिष्ठानच्या या उपक्रमातून बंदोबस्तांवरील पोलिसांना थोडासा का होईना दिलासा मिळणार आहे. यावर्षीच्या उपक्रमातून लक्षात येणाऱ्या त्रुटी लक्षात घेऊन पुढील वर्षी अधिक व्यापक स्तरावर हा उपक्रम हाती घेण्याचा संकल्प प्रतिष्ठानने केला आहे.

पर्यावरणपूरक फूड पॅकेटस्
बंदोबस्ताच्याअतिरिक्त तणावात पोलिसांच्या भोजन पाण्याच्या सुविधेकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे यावर्षी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी एकमुखाने निर्णय घेऊन त्यांना भोजन पाण्याची सुविधा उपक्रम हाती घेतला आहे. पॅकेटसचा कचरा साचू नये, यासाठी पर्यावरणपूरक कापडी पिशवीतून ड्रायफ्रुटयुक्त व्हेज पुलाव, तसेच पाण्याची बाटली बंदोबस्ताच्या ठिकाणी सभासदांमार्फत पोलिसांना देण्यात येईल.'' प्रमोदकाळभोर, सदस्य, आदर्श मराठा प्रतिष्ठान.