आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Seven Aword Get To Nashik, Na Hi Vairen Vairini Best Drama

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘न ही वैरेन वैरिणी’सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक; सात पुरस्कार नाशिकला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या या वर्षीच्या पुरस्कारांमध्ये नाशिककर रंगकर्मींनी बाजी मारली असून, प्रायोगिक गटात नाटकासह लेखन, दिग्दर्शन आणि अभिनयासह तब्बल सात विविध पुरस्कार नाशिककर कलावंतांच्या वाट्याला आले आहेत. या पुरस्कारांची घोषणा बुधवारी रात्री मुंबईत नाट्यपरिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.

ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रभरातून एकूण ३८ रंगकर्मींचा नाट्य परिषदेच्या पुरस्कारार्थींमध्ये समावेश आहे. त्यात नाशिकचे सहा रंगकर्मी असून, राज्य नाट्य स्पर्धेत बाजी मारलेले ‘न ही वैरेन वैरिणी’ या नाटकाला सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या नाटकाचे दिग्दर्शक मुकुंद कुलकर्णी अभिनेते हेमंत देशपांडे यांनाही दिग्दर्शन अभिनयासाठी पुरस्कार जाहीर झाला आहे. गेली काही वर्षे सातत्याने प्रायोगिक नाट्यलेखनात महाराष्ट्रभर आपली वेगळी छाप सोडणारे नाशिकचे नाट्यलेखक दत्ता पाटील यांना सर्वोत्कृष्ट प्रायोगिक लेखनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. अनेक एकांकिकांसह ‘बगळ्या-बगळ्या कवडी दे’, ‘रिमझिम रिमझिम’, ‘कृष्णविवर’ ही त्यांची अलीकडची नाटके रंगभूमीवर विशेष नावाजली आहेत.
याशिवाय लोककलेला गौरवताना हा पुरस्कारही नाशिकच्या पदरात टाकत लोककलावंत पुरस्कारासाठी शाहीर दत्ता शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. रंगभूषेची समृद्ध परंपरा चालवणाऱ्या नाशिकला या क्षेत्रासाठीही पुरस्कार मिळाला आहे. रंगभूषाकार रवींद्र जाधव यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पडद्यामागे राबणाऱ्या कष्टाळू रंगकर्मींनाही नाट्यपरिषद गौरवत असते. या वर्षीचा गुणवंत रंगमंच कामगाराचा पुरस्कार नाशिकच्या महाकवी कालिदासमध्ये गेली अनेक वर्षे राबणारे नेक रंगकर्मी वसंत दौंड यांना जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटकासह तब्बल सात पुरस्कार नाशिकच्या वाट्याला आल्याने नाशिकमधील नाट्यवर्तुळात उत्साहाचे, आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम कार्यवाह तथा मध्यवर्ती कार्यकारिणीचे सदस्य सुनील ढगे यांनी आनंद व्यक्त केला असून, या रंगकर्मींचे अभिनंदन केले आहे.