आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालगृहात अनाथ बालिकांचे कर्मचा-यांकडून लैंगिक शोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिकजवळील तवली फाटा येथील जय आनंद निराश्रित (अनाथ) बालगृहात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गैरप्रकारांना रविवारी वाचा फुटली. या बालगृहातील 6 ते 14 वयोगटातील मुलींचे तेथील पाच कर्मचा-यांकडून लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार तेथील काही बालिकांनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांकडे केल्यानंतर त्यांना रविवारीच महिला बालकल्याण विभागाच्या अभिरक्षणगृहात हलवण्यात आले. दरम्यान, सोमवारी या 34 बालिकांची जिल्हा रुग्णालयात नेऊन तपासणी करण्यात आली.

सुमारे आठ वर्षांपासून हे बालगृह कार्यरत आहे. या बालगृहात सध्या 6 ते 14 वयोगटातील 59 मुले आणि 34 मुली राहत आहेत. शाळेव्यतिरिक्त वेळेत या मुलींसमोर अश्लील चाळे करणे तसेच त्यांचे विविध प्रकारे लैंगिक शोषण सुरू होते.

मुली स्नान करत असताना दरवाजे-
खिडक्यांतून आत डोकावणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याची तक्रार मुलींनी महिला बालकल्याण समितीच्या सदस्यांसमोर केली.


असे आले उघडकीस प्रकरण
महिला बालकल्याण समितीचे सदस्य रविवारी जय आनंद निराश्रित (अनाथ) बालगृहाच्या तपासणीसाठी गेले. त्या वेळी समितीच्या महिला सदस्यांना काही मुलींनी घाबरत-घाबरत या गैरप्रकारांबद्दल माहिती दिली. त्याची त्वरित दखल घेऊन समितीने सर्व मुलींना नासर्डी पुलानजीक असलेल्या महिला बालविकास कल्याण विभागाच्या अभिरक्षणगृहात हलवले आहे.


मुलींच्या तक्रारीवरून जय आनंद निराश्रित अनाथ बालगृहातील भाऊसाहेब थोरात, संतोष थोरात, हरेश पाटील, राजेंद्र निकम आणि जगन्नाथ भालेराव या पाच कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महिला बालकल्याण समितीशी संपर्क साधून घडलेल्या प्रकाराबाबत माहिती विचारली असता प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती देता येणार नसल्याचे त्यांनी सांगितले.


हिंमत केली अन सांगून टाकलं
‘‘आम्हाला सगळ्यांना हे पाच जण स्पर्श करीत.. आम्ही मामाजींना सांगायचो. पण ते म्हणायचे, ‘पोरींनो, तुम्ही अभ्यासाकडे लक्ष द्या.’ पण दररोज हाच प्रकार चालायचा. हे सारं आठ वर्षं सुरू होतं. मोठ्या मुली घाबरून जायच्या. त्यामुळे त्यांनी कधीच काही सांगितलं नाही. हे लोक दिवसभरात खूप कष्टाची कामंदेखील करून घ्यायचे. भांडी घासावी लागायची. आम्ही मामाजींकडे तक्रार करायचो, परंतु ते त्या लोकांना दटावल्यासारखे करत दुर्लक्ष करायचे. काल आमच्या आश्रमात या ताई आल्या. त्यांनी विश्वासात घेऊन आम्हाला विचारलं. मग आम्ही सगळ्यांनी हिंमत करून अखेर सांगूनच टाकलं...’ वय वर्षे सात ते चौदादरम्यानच्या या कोवळ्या मुलींनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली. तब्बल 34 अनाथ मुलींना हा सारा छळ वर्षानुवर्षे सहन करावा लागत होता. काही मुलींनी आधीच या त्रासातून सुटका करून घेतली, पण काही जणी अडकलेल्याच होत्या. तार्इंकडे तक्रार केली आणि एका रात्रीत सगळ्या जणींची सुटका झाली. ताबडतोब दुस-या दिवशी 34 जणींना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. नेमकं कशाला इथे आणलं असावं बरं, असं प्रश्नचिन्हही त्यांच्या चेह-यावर नव्हतं. आपल्यावरील संकटही कळू नये, अशा या निष्पाप जिवांची ही व्यथा त्यांच्याच तोंडून ऐकताना मन हेलावून जात होतं.


मेडिकल रिपोर्ट हवा
याबाबत पंचवटी पोलिस ठाण्यात विचारणा केली असता कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी बी. बी. हिवराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पंचवटी पोलिसांना रविवारीच पत्र दिले असून गुन्हा दाखल करण्यासाठी मेडिकल रिपोर्ट लागणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे.


मुलींना कोसळले रडू...
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात 34 लहान मुली दुपारच्या सुमारास दिसत असल्याने तिथे उपस्थित अनेकांना कुतूहल वाटत होते. प्रथमच अशी तपासणी करण्यात येत आल्याने यापैकी काही मुलींना तर तपासणीनंतर रडूदेखील कोसळले.