आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ना‍शकात विद्यार्थिनींशी असभ्य वर्तन, शिक्षक अटकेत, पालक संतप्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- शहरातील बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये सातवी ते नववीच्या वर्गात शिकणा-या मुलींशी वारंवार असभ्य वर्तन करणा-या शिक्षकाविरुद्ध लेखी तक्रारी करूनही व्यवस्थापनाकडून त्याच्यावर कारवाई केली जात नसल्याने संतप्त झालेल्या पालकांनी शुक्रवारी संस्थाचालकांना जाब विचारला. अखेर पालकांच्या दबावामुळे झुकत संस्थाचालकांनी संशयित शिक्षक टी. बी. अहिरे यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दिली. त्यानंतर अहिरेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये इतिहास विषयाचे शिक्षक तात्याबा बंडू अहिरे (वय 45) हे नेहमीच मुलींशी द्विअर्थी संवाद साधतात. शिकवताना अश्लील विषयांवरच बोलतात तसेच बेंचेसवर बसून विचित्र हावभाव करत असल्याच्या तक्रारी या शाळेतील काही विद्यार्थिनींनी मुख्याध्यापकांकडे केल्या होत्या. तसेच हा प्रकार कुटुंबीयांनाही सांगितला होता. मुलींच्या तक्रारीवरून काही पालकांनी शाळेचे मुख्याध्यापक व व्यवस्थापनाबरोबर चर्चा करून संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली होती. या विषयावर शाळा व्यवस्थापनाने शुक्रवारी पालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत पालकांनी शाळा व्यवस्थापन दोषी शिक्षकास पाठीशी घालत असल्याचा आरोप करत जाब विचारला. तसेच संबंधित शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली. त्यानंतर मुख्याध्यापकांनी पोलिसांत तक्रार दिली.

साता-यातील पुनरावृत्ती- काही दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील एका प्रतिष्ठित शाळेतही विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार करणा-या शिक्षकाविरोधात पालक व सामाजिक संघटनांनी संताप व्यक्त केला होता. केवळ शाळेची बदनामी होऊ नये म्हणून सदर संस्थाचालकांनी आरोपी शिक्षकाविरोधात पोलिसात तक्रार देण्याचे टाळले होते. दरम्यानच्या काळात हा शिक्षक राजीनामा देऊनही पळूनही गेला होता. मात्र पालक व सामाजिक संघटनांनी आक्रमक होत संबंधित संस्थाचालक व शिक्षकांना आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार देण्यास भाग पाडले होते. त्यानंतरच या शिक्षकावर गुन्हा नोंद झाला होता.

तक्रारीनुसारच कारवाई - इयत्ता सातवी ते नववीतील जवळपास 29 विद्यार्थिनींनी आपल्याकडे केलेल्या तक्रारीनुसार व्यवस्थापनाशी चर्चा करून भद्रकाली पोलिस ठाण्यात शिक्षक अहिरे यांच्याविरुद्ध अर्ज देण्यात आला. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.’’- रत्ना काळे, मुख्याध्यापिका

विनयभंगाचा गुन्हा- बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये शिकणा-या 29 मुलीं व त्यांच्या पालकांनी लेखी तक्रार अर्ज पोलिस ठाण्यात आणला होता. या वेळी पालक, मुख्याध्यापकांच्या तक्रारीनुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करीत संशयित अहिरे यांना अटक केली.- बाळासाहेब बोरकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक