आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन् थिएटरमध्येच भरली ‘शाळा’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक: ए फावड्या, चल आटप, शाळेची येळ झाली, म्हात्रे अरे बेबीकरने दिलेला गृहपाठ झाला का?’ असे संवाद आठवले की प्रत्येकाला आपली शाळा आठवल्यावाचून राहत नाही. प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील यांच्या पौगंडावस्थेतल्या शाळेतल्या मुलांची मनोवस्था रेखाटणार्‍या ‘शाळा’ या गाजलेल्या पुस्तकावर आधारित ‘शाळा’ हा सुजय डहाके दिग्दर्शित चित्रपट शुक्रवारी येथील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.
प्रमुख पात्र मुकुंद जोशी या पात्राने सगळ्य़ांनाच शाळेच्या कडू-गोड आठवणींत नेले. आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट साकारलेला आहे. मात्र, पहिल्या दिवशी या चित्रपटास प्राध्यापक, वयोवृद्धांची संख्या अधिक होती. उत्कृष्ट दृश्यचित्रण, शाळकरी वाटावेत असे चपखल संवाद, पौगंडावस्थेतल्या मुलांच्या मानसशास्त्राचा चोखपणे केलेला अभ्यास आणि त्याचे या चित्रपटाच्या कथानकात पडलेले प्रतिबिंब यामुळे हा चित्रपट शेवटपर्यंत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी ठरला. दिलीप प्रभावळकरांनी रंगवलेला मुख्याध्यापक, अमृता खानविलकरची मॉडर्न शिक्षिकेची भूमिका, देविका दफ्तरदारची कडक शिक्षिका भाव खाऊन गेली. तसेच बालकलाकारांनी देखील उत्तम अभिनय केला.
यशस्वी माध्यमांतर
आपलीच शाळा वाटावी इतपत जिवंतपणा ‘शाळा’ या पुस्तकात आहे आणि हा जिवंतपणा चित्रपटातदेखील पहायला मिळतो. याआधीदेखील या पुस्तकावर आधारित एकांकिका मुंबईच्या रुईया महाविद्यालयाने सादर केली होती तसेच यावर दोन अंकी नाटक आणि हिंदीमध्ये ‘हमने जीना सीखलिया’ हा चित्रपटदेखील येऊन गेला होता. सुजय डहाके या तरुण दिग्दर्शकाचा हा मराठी चित्रपटदेखील खरीखुरी शाळा भरविण्यात यशस्वी झाला आहे.