आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीलांजन समाभासम, रविपुत्रम..

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - श्री शनि महाराजांचा जन्मोत्सव शनिवारी शहरात मोठय़ा भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. विविध शनिमंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. या वेळी पालखी व शोभायात्रा काढण्यात आली. तसेच, गेल्या आठ दिवसांपासून विविध मंडळांकडून घेण्यात आलेल्या सांस्कृतिक स्पर्धांचा समारोप झाला.

तब्बल दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या शनि चौकातील मंदिरात शनि महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी 6 वाजता रमेश इंदाणी व शनि मंदिर ट्रस्टचे रघुनंदन मुठे यांच्या हस्ते लघुरुद्राभिषेक करण्यात आला. त्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी सवाद्य पालखीची मिरवणूक काढण्यात आली. शनि चौक, मालवीय चौक, शिवाजी चौक, सीतागुंफा, राममंदिर पूर्वदरवाजा, सरदार चौक ते मुठे गल्ली मार्गे पुन्हा मंदिरात पालखी आणण्यात आली. या जन्मोत्सवानिमित्त गेल्या आठ दिवसांपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याचे विश्वस्त नंदकुमार जानोरकर यांनी सांगितले. भद्रकाली परिसरातील शनि महाराज मंदिरात विश्वकल्याणार्थ समग्रमख श्री शनैश्चर महायज्ञ तसेच शांतीसूक्त, स्थानदेवता दर्शन, प्रायश्चित्तपूर्वक प्रधान संकल्प, श्रींची पालखी, तैलाभिषेक महापूजन, नवग्रह रुद्र स्थापना, हवन, पूर्णाहुती महाआरती, मंत्रपुष्पांजली, विश्वशांतीसाठी प्रार्थना अशा विविध धार्मिक पूजा करण्यात आल्या. मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक हरिभाऊ लोणारी यांच्या हस्ते पूजाविधी करण्यात आला. या वेळी नीलेश भालेराव, दीपक बाविस्कर हे उपस्थित होते. येथेही भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी 10 हजार शनिअष्टकाचे वाटप करण्यात आले. बुधवारी (दि. 12) अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

रविवारपेठेतील श्री शनैश्चर नवग्रह मंदिरात पहाटे 5 वाजता ओमप्रकाश मोरे यांच्या हस्ते महारुद्र अभिषेक करण्यात आला. तर, 8 वाजता शनि महाराजांची पालखी काढण्यात आली. 11 वाजता महायाग सुरू झाला. सायंकाळी 6 वाजता शोभायात्रा काढण्यात आली. त्यात मोठय़ा संख्येने भाविक सहभागी झाले होते. शनि महाराजांच्या दर्शनासाठी नागरिकांनी दिवसभर गर्दी केली होती.