आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - नरेंद्र मोदींनी ‘व्होट फॉर इंडिया’चा नारा देऊन इंडियासाठी मते मागितली. मात्र, आम्ही भारतासाठी मते मागणार आहोत, असे शरद पवार यांनी सांगत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. तसेच, अन्नधान्याचे भाव कमी करण्याचे स्वप्न दाखवणार्या ‘आप’सारख्या पक्षांनी उत्पादनखर्च कमी करून दाखवावा, असे आव्हानही त्यांनी येथील राष्ट्रवादीच्या जिल्हा मेळाव्यात दिले.
पवार म्हणाले की, पंतप्रधानपदाचा उमेदवार जनता ठरवते. मात्र, स्वत:च उमेदवार जाहीर करणे म्हणजे जनतेच्या अधिकारावर गदा आणण्यासारखे आहे. त्याचा जनतेने विचार करून धडा शिकवावा, असा टोला त्यांनी मोदींचे नाव न घेता लावला. ‘व्होट फॉर इंडिया’चा नाराच विचित्र आहे. यापूर्वी संघर्ष करून ईस्ट इंडिया कंपनीला घालवले. आता पुन्हा ‘इंडियासाठी व्होट’ असा प्रचार होतोच कसा, असा प्रश्न त्यांनी केला. धर्मांध शक्तींविरोधात लढा देणे हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचेही त्यांनी सांगितले. आजघडीला अन्नधान्याच्या भावात चढ-उतार होत असला तरी त्यास प्रत्येक वेळी मला जबाबदार धरून चालणार नाही. शेतकर्यांना कर्ज माफी, 4 टक्के व्याजदराने कर्ज देणे, तांदूळ, गव्हाची 18 देशांत निर्यात करणार्या भारताने दोन लाख 32 हजार कोटी रुपयांचे उत्पन्न देशाच्या तिजोरीत टाकले आहे. देशातील गरीब जनतेला अन्नसुरक्षा देणारा कायदाही राष्ट्रवादीच्या प्रयत्नातून झाल्याचे त्यांनी सांगितले.
सत्ता दिल्यावर चालू बाजारभावाच्या 50 टक्के दरात धान्य, भाजीपाला देऊ, असे आश्वासन देणे सोपे आहे. तसे ‘आप’सारख्या पक्षांनी करूनही दाखवावे. मात्र, हे करताना शेतकर्यांचे नुकसान होणार नाही हे पाहिले पाहिजे. आजघडीला उत्पादन खर्च प्रचंड असून, आधी खतांच्या किमती कमी करा, असे आव्हानही त्यांनी दिले.
गोरगरीब, शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमस्वरूपी कार्यरत राहणार्या शरद पवार यांच्यामागे महाराष्ट्राने उभे राहावे, असे आवाहन आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी केले. पक्षाचे पदाधिकारी आणि संघटनेच्या माध्यमातून खेडे, पाडे, गाव, वस्त्या पिंजून काढून महाराष्ट्रात जास्तीत जास्त पक्षाचे खासदार आम्ही निवडून आणू, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी व्यक्त केला. तसेच नाशिकपाठोपाठ दिंडोरी मतदारसंघाचा गडही जिंकून आणू, असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या महिला कॉँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण यांनी मनसेला लक्ष्य करीत खोटी स्वप्न दाखवणार्यांना धडा शिकवा, असे आवाहन केले. गोदापार्क, विकासाची ब्लू प्रिंटसारख्या बंद खोलीत बसून केलेल्या कल्पनांना मूर्त स्वरूप मिळत नाही, असा टोला त्यांनी लगावला, तर कार्यकारी अध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत चुकीचा इतिहास सांगणार्यांकडून भूगोल खराब करून घेऊ नका, असे आवाहन केले.
प्रास्ताविकात समीर भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील विकासकामांची माहिती देत आगामी काळातील महत्त्वांच्या कामांचा आढावा मांडला. सूत्रसंचालन आमदार जयवंत जाधव व हेमंत टकले यांनी केले. या वेळी आमदार पंकज भुजबळ, तापी खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष ए. टी. पवार, जिल्हा परिषद अध्यक्षा जयर्शी पवार, बांधकाम सभापती अलका जाधव, जिल्हाध्यक्ष अँड. रवींद्र पगार, शहराध्यक्ष शरद कोशिरे, प्रकाश गजभिये, दिलीप खैरे, अमृता पवार, उन्मेष पाटील, नाना महाले, सुनील बागुल, देवीदास पिंगळे, शोभा मगर, कविता कर्डक, तुकाराम दिघोळे, नीलेश राऊत, दीपक वाघ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.